शिंदखेडा शेतकऱ्याचे धरणे, विद्युत रोहित्र नसल्याने डिझेल पंपाचा वापर

59

सामना ऑनलाईन, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील दभाशी परिसरात विद्युत रोहित्र नसल्याने पिके धोक्यात आली आहेत. पदरमोड करुन शेतकरी डिझेल पंपाचा वापर करीत आहेत. पण दीर्घकाळ डिझेल पंपाचा वापर केला तर शेतीमाल उत्पादनाचा खर्च परवडणार नाही. जिल्हाधिकाऱयांनी लक्ष घालून विद्युत रोहित्र बसविण्याचे यंत्रणेला आदेश द्यावेत, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले.

शिंदखेडा तालुक्यातील दभाशी या गावाच्या शिवारात असलेले वीज कंपनीचे रोहित्र काही आठवड्यापूर्वी जळाले. शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीला वस्तुस्थिती सांगितली. अनेकांच्या शेतात रब्बी हंगामातील काही पिके तर काहींच्या शेतात उन्हाळी पिके आहेत. या पिकांना विहिरीच्या पाण्याची गरज आहे. हे पाणी कृषी पंपाचा वापर करूनच दिले जाते, पण रोहित्र बंद असल्याने पिकांचे नुकसान होत आहे.

शेतकऱ्यांनी पर्यायी व्यवस्था म्हणून डिझेल पंपाच्या मदतीने शेती सिंचनाखाली आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण उन्हाळी पिकांची काढणीपर्यंत डिझेल पंप वापरला तर शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडणार नाही. वीज वितरण कंपनीकडे अनेकदा निवेदने दिली पण उपयोग झालेला नाही. दभाशी येथील शेतकऱ्यांच्या समुहाने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निदर्शने केली.

विद्युत रोहित्र बसविणे गरजेचे आहे असे सांगत प्रशासनाला निवेदन दिले. वीज कंपनीला तातडीने विद्युत रोहित्र बसविण्याचा आदेश द्यावा नाही अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराच देण्यात आला. यावेळी शरद पाटील, सैयद युनूस, चंद्रकांत पाटील, मधुकर कोळी, अनिल पाटील, संजय पाटील, विनायक पाटील यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या