ट्विटरवर महिलांची सर्वाधिक ‘फॅशन’ पे चर्चा, जागतिक महिला दिनानिमित्त ट्विटरचा अहवाल

सध्याच्या डिजिटल युगात आपल्या मनातील विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम म्हणजे सोशल मीडिया. पुरुषांप्रमाणे महिलादेखील मोठय़ा प्रमाणावर सोशल मीडियावर ऍक्टिव आहेत. ट्विटरवर महिला सर्वाधिक जास्त कोणत्या विषयांवर चर्चा करतात याबाबतचा अहवाल नुकताच ट्विटरने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध केला आहे. यानुसार महिलांची सर्वाधिक चर्चा फॅशन या विषयावर होत असल्याचे समोर आले आहे.

हिंदुस्थानात तब्बल 1.75 कोटी ट्विटर युजर्स आहेत. त्यात महिला युजर्सची संख्यादेखील मोठी आहे. या सर्वेक्षणासाठी ट्विटर इंडियाने जानेवारी 2019 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत दहा शहरांमधील 700 महिलांनी केलेल्या तब्बल 5 लाख 23 हजार ट्विटचा अभ्यास केला होता. महिला सर्वाधिक कोणत्या विषयांवर चर्चा करतात हे शोधण्याचा याद्वारे प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानुसार 30 टक्के फॅशन, 28 टक्के पुस्तक, 25 टक्के सौंदर्य, 21 टक्के मनोरंजन, 18 टक्के संगीत, 14 टक्के क्रीडा आणि 18 टक्के महिला खाद्यपदार्थ आदी विषयांवर व्यक्त होताना दिसल्या.

सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात बंगळुरूमधील महिला अव्वल

बंगळुरूतील महिला समाज, सामाजिक बदल या विषयांवर सर्वाधिक ट्विट करतात. तर गुवाहाटीच्या महिला ट्विटरवर फॅशन आणि चालू घडामोडींबद्दल सर्वाधिक व्यक्त होतात. आवड आणि रुची या विषयावर गुवाहाटी, लखनौ आणि पुणे येथील महिलांनी सर्वांत जास्त चर्चा केली. देश आणि जगाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी 20.8 टक्के महिलांनी ट्विटरवर लॉग इन केल्याचेही या सर्वेक्षणात समोर आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या