तिहारमधील कैद्यांचे फॅशनच्या दुनियेत पदार्पण

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

नवी दिल्लीतील तिहार कारागृहातील कैदी लवकरच फॅशनच्या दुनियेत पदार्पण करणार आहेत. या कैद्यांचे पुर्नवसन करण्यात येत असून त्यांतर्गत त्यांना तज्ञांकडून फॅशन डिझाईनिंगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

कैद्यांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवत असते. याच पार्श्वभूमीवर कैद्यांना स्वताच्या पायावर उभे राहता यावे यासाठी त्यांना देशातील सर्वच तुरुंगात स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले जाते. तिहारमधील कैद्यांना फॅशनचे ज्ञान मिळावे यासाठी तुरुंग प्रशासनाने नुकतेच एका फॅशन शोचे आयोजन केले होते.त्याला कैद्यांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यानंतर काही महिला व पुरुष कैद्यांनी फॅशन डिझाईनिंगचे प्रशिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची दखल तुरुंग प्रशासनाने घेतली.त्यानंतर योग्य त्या कायदेशीर परवानगी घेऊन कैद्यांना तुरुंगातच फॅशन डिझाईनचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे.यासाठी तुरुगांत फॅशन लॅबही सुरु करण्यात आली आहे.

प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कैद्यांनी तयार केलेले कपडे फॅशन शोच्या माध्यमातून बाजारात आणले जाणार आहेत.