ब्रा आणि हाय हिल्स घातल्यानंतर माझे आयुष्य बदलले! लिंगबदल केलेल्या मराठी फॅशन डिझायनरचे उद्गार

प्रसिद्ध मराठी फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदे याने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आहे. स्वप्निलने त्याचे नाव बदलून सायशा शिंदे ठेवले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सायशा या क्षणाची वाट पाहत होती मात्र अनेक कारणांनी तिचं हे स्वप्न पुढे पुढे जात होतं. मात्र सर्वांसाठी त्रासदायक ठरलेला हा लॉकडाऊन सायशासाठी मात्र वरदान ठरला आहे. स्वप्निलची रखडलेली शस्त्रक्रिया या लॉकडाऊनमध्ये पार पडली.

स्वप्निल उर्फ सायशा शिंदे ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर असून तिने बॉलिवूडमधील सर्व टॉपच्या अभिनेत्रींसाठी कपडे डिझाईनम केलेले आहेत. नुकतंच सोशल मीडियावर फोटो व पोस्ट शेअर करत तिने लिंगबदलाबद्दल जाहीर केले आहे. त्यानंतर एका प्रसिद्ध दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सायशाने या शस्त्रक्रियेनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेल्याचे सांगितले आहे. ‘ज्या दिवशी मी ब्रा व हाय हिल्स घातले त्या दिवसानंतर माझे आयुष्य पूर्ण बदलून गेले. त्याआधी मी फक्त चार भिंतीच्या आत व बाथरुममध्येच महिलांचे कपडे घालायचे. आता मी ते सर्वांदेखत घालू शकते”, असे सायशा सांगते.

सहा वर्षांपूर्वी सायशाला तिच्यातील वेगळेपणाची जाणीव झाली. तेव्हापासून तिचा हा बदलाचा प्रवास सुरू झाला. ‘सहा वर्षापूर्वी मी हे मान्य केले मी पुरुष नाही. मी गे नाही. मी ट्रान्सवुमन आहे. एका पुरुषाच्या शरीरात बाई लपलेली आहे. त्यामुळे तुमचे बाहेरील वागणे तुमच्या अंतर्गत भावनांना नाही दाबून ठेवू शकत. त्यामुळे मला एका ट्रान्सवुमन म्हणूनच ओळखले जावे असे मला वाटायचे. मी अनेकदा शस्त्रक्रियेचा विचार केला. मात्र प्रत्येकवेळी काही ना काही कारणाने ते लांबत गेलं. कुणी म्हणायचं की तु किती हँडसम आहेस, मुलगी बनू नकोस. तर कुणी समाजाची भीती दाखवायचे. मात्र लॉकडाऊनमध्ये सर्व आपआपल्या घरात अडकले व तिथेच मला संधी मिळाली. या लॉकडाऊनमध्ये माझा नवीन जन्म झाला आहे” असे सायशाने सांगितले.

आई वडिलांनी दिला पाठिंबा

‘मला माझ्या आई वडिलांची काय प्रतिक्रीया असेल याचं टेन्शन होतं. मी एका सामान्य महाराष्ट्रीय कुटुंबातून आलो आहे. पण जेव्हा मी आई वडिलांना सांगितलं तेव्हा त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. वडिलांनी तर खर्च किती होईल, कुठला डॉक्टर शोधला याबाबत विचारले. तसेच शस्त्रक्रियेनंतर नाव बदलल्यास प्रॉपर्टी पेपर्सवर देखील नाव बदलावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. त्यांचे हे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. त्यांनी माझ्यासाठी हे खूप सोप्पे करून दिले होते’, असे साय़शा म्हणाली.

आपली प्रतिक्रिया द्या