फॅशन डिझायनर ते दिग्दर्शक

 

नमिता वारणकर, namita.warankar@gmail.com

विक्रम फडणीस… फॅशन जगतातील आघाडीचं एक मराठी नाव… २५ वर्षांहून अधिक काळ फॅशन डिझायनिंग करताना तो सिनेमाच्या दिग्दर्शनाकडे वळला… ‘हृदयांतर’ हा त्याचा पहिला चित्रपट… मुळातच दिग्दर्शनाची ओढ असलेल्या विक्रम फडणीसने उलगडला त्याचा फॅशन डिझायनर ते दिग्दर्शक हा प्रवास…

बऱयाचदा आपण करीयरची जी वाट निवडलेली असते त्याऐवजी कधीतरी वेगळय़ा वाटेने जावं लागतं. आपल्याला हवी असलेली वाट सहज गवसत नाही. माझ्याबाबतीतही तेच झालं. दिग्दर्शक म्हणून करीयर करायचं हे मी आधीपासूनच ठरवलं होतं, मात्र माझ्या करीयरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून झाली. एका फॅशन डिझायनरबरोबर काम करता करता मी फॅशन जगतात दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो. तेव्हाच २००३-४ साली मी सिनेमासाठी कथा लिहित होतो. आतापर्यंत ३ कथा लिहिल्या. त्यापैकी एक ‘हृदयांतर’ आहे, असं विक्रम फडणीस आपल्या पहिल्या सिनेमाविषयी सांगतो.

सिनेमाची कथा हिंदीत असूनही मराठीत सिनेमा सादर झाला. याविषयी तो सांगतो की, ‘हृदयांतर’ची कथा हिंदीत लिहिली होती. माझ्या आयुष्यात आलेली कोणतीही संधी मी कधीही नाकारली नाही. तसंच या सिनेमाच्या बाबतीत घडून आलं. हिंदीत लिहिलेली कथा मराठीत सादर करण्याची संधी मिळाली तेव्हा मनात विचार आला की, मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि आज मराठी सिनेमा इतका मोठा झालाय की, जे महाराष्ट्रीयन नाहीत तेही मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघतात तर हिंदीतल्या कथेचं मराठी चित्रपटात सादरीकरण करायला काय हरकत आहे?

‘हृदयांतर’ हा एका कुटुंबाचा प्रवास आहे. हा प्रवास तुम्ही कुटुंबीयांबरोबर पाहू शकता. चित्रपट जगतात सध्या काय चाललंय याचा अंदाज घेऊन या सिनेमाची कथा लिहिलेली नाही. मला जे लोकांपर्यंत पोहोचवायचं होतं ते लिहिलं. फक्त त्याकरिता एकच लक्षात ठेवलं की, आपल्याला लोकांपर्यंत जायचं आहे. विशेष म्हणजे, याआधी मराठी सिनेसृष्टीतील कोणत्याही कलाकाराला मी ओळखत नव्हतो.  फक्त नावं ऐकली होती. विशेष म्हणजे, या कलाकारांना आपल्या क्षेत्रात प्रतिस्पर्धी आहेत हेही मला माहीत नव्हतं. सिनेमाचं कास्टिंग वेगळय़ा प्रकारे व्हायला हवं असं वाटतं होतं. फक्त एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री माझ्यासमोर बसली की, मला आतून काय वाटतंय हेच बघितलं. त्यामुळे सिनेमाच्या नकारात्मक, सकारात्मक कोणत्याही यशासाठी मीच जबाबदार असेन, असं त्याचं म्हणणं आहे.

पहिल्यांदाच सिनेमाचं दिग्दर्शन करताना आलेल्या अनुभवाविषयी तो सांगतो की, ‘हृदयांतर’वर काम करायला सुरुवात केली तेव्हा आपण फॅशन शो करत नाही हे कळलं. आपल्याला हा सिनेमा ३० हजार मैलांवरील ३०० लाख लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. यासाठी फॅशन शो करताना माझे जितके नियोजन असते तसंच नियोजन कौशल्य वापरून हा सिनेमा बनवलाय. एक सिनेमा करताना कलाकार, स्पॉटबॉय, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, लाइटमन, सहाय्यक दिग्दर्शक, कॉश्च्युम, मेकअप एवढय़ा लोकांबरोबर डील करावं लागतं. फिल्म शूट करताना मनात भीती होती की, मी या सिनेमात काम करणाऱया दोनशे लोकांना एकत्र कसं ठेवेन; पण ती भीती त्यांना भेटल्यावर गेली.

प्रत्येकाने आपल्या कामाला न्याय दिलाय. कोणतीही गोष्ट अधिकार, रागाने सांगून होत नाही. ती प्रेमाने होत असते हे दिग्दर्शक म्हणून शिकता आलं. या सिनेमातील संगीत हीच कथा आहे. प्रत्येक संगीताला एक मोन्ताज आणि टाइम फेज आहे, असंही तो स्पष्ट करतो.

माझंच ‘हृदयांतर’ झालं…

माझ्या करीयर प्रवासात मी बरेच शोज आणि इव्हेंट केले आहेत, पण ‘हृदयांतर’ सिनेमाचा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा आहे. यासाठी २०-२०१७ हे एक वर्ष माझ्यासाठी खूप मोलाचं होतं असं मानेन. कारण हा सिनेमा दिग्दर्शित करण्याचा अनुभव हा माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. तुमच्या आयुष्यात एक क्षण असा येतो की, आयुष्य बदलून जातं. माझ्या या पहिल्या सिनेमाच्या दिग्दर्शनामुळेही तेच घडलं. यापुढेही मी अनेक सिनेमे करेन, पण ते या सिनेमासारखे नसतील. म्हणून ‘हृदयांतर’ बनवताना माझंच हृदयांतर झालं असं विक्रम मानतो.