हेमा! फॅशन तिच्याप्रमाणे बदलते…

675

>> लीना टिपणीस

स्वप्नसुंदरी हेमा मालिनी. तिची स्वतःची सिग्नेचर स्टाईल आहे. साडीत तिचे सौंदर्य अधिक खुलते.

जिच्या सौंदर्याचे अनेकजण आजही चाहते आहेत….जिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना अनेक दशकं भुरळ घातली आणि जिला बॉलीवूडमध्ये ड्रीम गर्ल म्हटलं जात अशी एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. कुठलीही फॅशन फॉलो न करता स्वतःची सिग्नेचर स्टाईल तिने निर्माण केली. आजही हेमा मालिनीचा रुबाब , तिचे सौंदर्य अबाधित आहे. तिच्याविषयी जाणून घेऊया.

हेमा मालिनी यांना फॅशनचा चांगला समज आहे. तिच्या फॅशन सेन्समुळे काळाचा त्यावर काहीएक परिणाम झाला नाही, काळाबरोबर तिने स्वतःला बदलले नाही, ज्या कपडय़ांमध्ये ती स्वतःला कम्फर्टेबल समजते, ज्यामध्ये आत्मविश्वासाने वावरू शकते असे कपडे तिला आवडतात. तिची कुठलीही स्टाईल कुठेही समकालिन वाटत नाही. साधेपणा हेच सौंदर्य असं तिला वाटतं आणि ते ती फॉलो करते. तिच्या कपडय़ांमध्ये पण तो साधेपणा जाणवतो. सुटसुटीत कपडय़ांवर तिचा जास्त भर असतो. ती अशा प्रकारच्या कपडय़ांना प्राधान्य देते की ती दिवसभर फ्रेश राहील. ती गेल्यावर्षी माझ्याकडे आली होती. मधल्या काळात ती एक कॅम्पेन चालवत होती त्या वेळेत मी तिच्यासाठी बरेच कपडे डिझाईन केले. त्यावेळी तिने मला काही सूचना केल्या होत्या. यामध्ये तिच्या कुठल्याही कपडय़ांमधून अंगप्रदर्शन होऊ नये, गळा अजिबात डिप नको, ब्लाऊजचा हात थ्री फोर्थ लेन्थ हवा अशा त्यांनी आधीच सूचना दिल्या होत्या.

खरंतर हेमा मालिनी फार मनोरंजक व्यक्तिमत्त्व आहे. तिचा सेन्स ऑफ ह्युमर फार चांगला आहे. ती जशी ऑन स्क्रीन ड्रीम गर्ल आहे अगदी तशीच प्रत्यक्ष जीवनातही आहे. एकदा तिचं एक कानातलं ट्रायल रूमममध्ये पडलं आणि ती अगदी गमतीदार मूडमध्ये ‘झुमका गिरा रे’ हे गाणं गायला लागली. हे ऐकून आमचे कारागिर, मास्टर्स शोरूमच्या दिशेने सगळे धावत आले कारण त्यांना वाटले आता त्या नाचणार आहेत की काय? ते मनोरंजन पाहायला आले. कारण ड्रीम गर्ल 70-80च्या दशकातील त्यांच्या समोर आहे, काही कपडे ती ऑर्डर करतेय, त्यांना तिच्या कपडय़ांसाठीं माप घेण्यासाठी परवानगी देतेय आणि त्याच्यामध्ये तिचं जेव्हा एक कानातलं पडलं तेव्हा तिने किती आनंदाने झुमका गिरा रे हे आम्हाला सर्वांना गाऊन दाखवलं. तो क्षण गमतीदार वाटला.

माझ्या मते हेमा मालिनीना सगळ्यात जास्त साडी सूट होते. साडीत तिंचं सौंदर्य आणखी खुलंतं. पण त्याचबरोबर चुडीदार-कुर्ताज, पारंपारिक कपडे तिला शोभून दिसतात. ती जास्त फॅशन-ट्रेण्ड फॉलो करत नाही. मुळात ती ट्रेण्डनुसार चालणारी नाही आहे. तिची स्वतःची अशी वेगळी सिग्नेचर स्टाईल आहे. कॅप स्लीव्ह कुर्ता किंवा थ्री फोर्थ स्लीव्ह यामध्ये तिला अनेकदा पाहिलेय पण तिला कधीच स्लीव्हलेसमध्ये कोणी पाहिले नाही. कपडय़ांच्या बाबतीत ती कधी वेगळे प्रयोगही करत नाही. पण तिचे कपडे नेहमी क्लासिक, पारंपरिक असतात. बऱयाचदा व्ही नेकच्या कपडय़ांना ती जास्त प्राधान्य देते. त्याचबरोबर तिचे कुर्तेही गुडघ्यापर्यंत किंवा गुडघ्याच्याखालपर्यंत असतात. सिग्रेट पॅण्ट्स किंवा चुडीदार घालणं पसंत करतात. हेमा मालिनी पूर्णपणे क्लासिक ड्रेसर आहे. तिला जास्त घट्ट कपडे किंवा जास्त सैलसर कपडे आवडत नाहीत. कुठलेही कपडे घातल्यावर ते आपल्याला शोभले पाहिजेत असे तिला वाटते. त्यामुळे ती कपडय़ांच्याबाबतीत स्वतः खूप सजग आहे. कोणते कपडे घालावेत, कोणते घालू नयेत याचे चांगले ज्ञान तिला आहे. त्यामुळे मला स्वतःला वाटतं की साडी तिच्यावर जास्त शोभून दिसते. तिला चार-चौघात आत्मविश्वासाने वावरता येईल असे कपडे घालायला आवडतात, कुठही अंगप्रदर्शन होणार नाही याबाबत ती कायम दक्ष असते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या