FASTag कसे रजिस्टर कराल? वाचा संपूर्ण माहिती

4561
fastag-toll-plaza

चार चाकी खासगी वाहन आणि व्यावसायिक वाहनांना 1 डिसेंबर 2019 पासून फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात आला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी तशी घोषणा केली आहे.

महामार्गावरील वाहतूक जलद व्हावी, टोलनाक्यांवरील वाहनांची रांग बंद व्हावी तसेच टोल वसुलीच्या रकमेत सुसूत्रता यावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयाने आता 1 डिसेंबरपासून वाहनांसाठी फास्टॅग तयार केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्रालयाने 19 जुलै 2019 ला परिपत्रक जारी केले. त्याची अंमलबजावणी आता होत आहे.

वाहनचालकांना विशिष्ट टॅग देण्यात येणार आहे. हा टॅग नसेल आणि वाहन फास्टॅगच्या ट्रॅकवर आले तर त्या चालकाकडून दुप्पट पैसे वसूल केले जाणार आहेत.

काय आहे ‘फास्टॅग’?

इलेक्ट्रॉनिक टोल पेमेंटसाठी 1 डिसेंबरपासून ‘फास्टॅग’ वापरण्यात येणार आहे. ‘फास्टॅग’च्या माध्यमातून वाहनांना टोलनाक्यावर न थांबता टोल चुकता करता येणार आहे. हा ‘फास्टॅग’ बँकांकडून खरेदी करता येणार आहे. टोलनाक्यावर ऑटोमॅटिक ट्रान्स्जॅक्शनसाठी वाहनाच्या विंडस्क्रीनमध्ये ‘फास्टॅग’ लावला जातो.

फास्टॅग (FASTag) कसे रजिस्टर कराल?

तुम्ही 22 सर्टिफाईड बँकामधून फास्टॅग मिळवू शकतात. या बँकांमधून पॉईंट ऑफ सेल (POS)च्या माध्यमातून फास्टॅग उपलब्ध होतील. एसबीआय, एचडीएफसी, अ‍ॅक्सिस, पंजाब नॅशनल बँकांसह पेटीएम, अॅमेझॉन सारख्या ई-प्लॅटफॉर्मवर फास्टॅग उपलब्ध असणार आहेत.

फास्टॅग कसे अॅक्टिवेट करणार?

fastag-toll-bank

1) बँकेच्या कार्यालयातून मिळणार फास्टॅग

फास्टॅग मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेच्या जवळच्या कार्यालयात जाता येईल. जिथे तुम्ही FASTag तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करू शकाल. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी 22 बँका निश्चित करण्यात आल्या आहेत. याच बँकांमधून तुम्हाला FASTag कार्यान्वित करता येणार आहे.

बँकेचे खाते जोडताना तुम्हाला KYC (Know Your Customer) भरणे बंधनकारक असेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या वाहनाचे Registration Certificate (RC) अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

2) मोबाईल अॅपद्वारे बँक अकाऊंट लिंक करण्याचा पर्याय

तुम्ही POS टर्मिनल किंवा ऑनलाईनद्वारे फास्टॅग खरेदी करू शकता. ऑनलाईन प्रणालीमध्ये DIY (Do-It-Yourself) असा एक पर्याय देण्यात आला आहे. ज्यामध्ये तुम्ही ‘My FASTag’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून वाहनाची योग्य ती माहिती भरून ते अॅक्टिवेट करता येईल.

त्यानंतर निश्चित करण्यात आलेल्या 22 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेशी तुम्ही फास्टॅग अॅप लिंक करू शकता. NHAI (National Highways Authority of India) द्वारे प्रिपेड वॉलेटचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. जो पर्याय My FASTag मोबाईल अॅपमध्ये देखील उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुम्ही पैसे लोड करू शकता, जेणेकरून टोल भरताना तुमच्या बँकेच्या खात्यातून पैसे कापले जाणार नाहीत.

फास्टॅगचे चार्ज कसे आकारले जाणार?

FASTag सर्टिफाईड बँका प्रत्येक टॅगसाठी जास्तीत जास्त 100 रुपये आकारू शकतात. ही किंमत National Payments Corporation of India (NPCI) कडून निश्चित करण्यात आली आहे. टॅग खरेदी करताना वेगवेगळी रक्कम आकारली जाऊ शकते.

उदाहरणार्थ, एका कारसाठी HDFC बँक FASTag 400 रुपयाला विकत असल्यास – त्यामध्ये 100 रुपये टॅग फी असेल. 200 रुपये रिफंडेबल सिक्युरीटी डिपॉझिट असेल. तर 100 रुपये टॅग चार्जसाठी वॉलेटमध्ये जमा करण्यात येतील.

ICICI बँक FASTag 499.12 रुपयात विकत असल्यास, 99.12 रुपये टॅग फी असेल. 200 रुपये रिफंडेबल सिक्युरीटी डिपॉझिट असेल. तर 200 रुपये टॅग चार्जसाठी वॉलेटमध्ये जमा करण्यात येतील.

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे टॅग खरेदी करताना कदाचित अधिक किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे. कारण या कंपन्या त्यांचा नफा देखील या किंमतीतून वसूल करतील अशी शक्यता काही जण व्यक्त करत आहेत.

रिचार्ज कसे कराल?

जर तुम्ही FASTag बँक खात्यासोबत थेट जोडले असेल तर प्रिपेड वॉलेटमध्ये पैसे भरण्याची गरज नाही. तुमच्या खात्यातूनच ती रक्कम वजा केली जाईल. जर तुम्ही प्रिपेड वॉलेटसोबत खाते लिंक केले असेल तर UPI/ Credit Card/ Debit Card/ NEFT/ Net Banking द्वारे तुम्ही वॉलेट रिचार्ज करू शकता. मात्र असे रिचार्ज करताना तुम्हाला या सेवेसाठी अतिरिक्त पैसे देखील मोजावे लागू शकतात.

किती रुपये प्रिपेड वॉलेटमध्ये ठेवू शकता?

* Limited KYC FASTag खातेधारकांसाठी-

या प्रकारच्या खातेधारकांना 20,000 रुपयांपर्यंतची रक्कम प्रिपेड वॉलेटमध्ये जमा करता येऊ शकते. महिन्या 20,000 रुपयांची कॅप असेल.

* Full KYC FASTag खातेधारकांसाठी-

या प्रकारच्या खातेधारकांना 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम प्रिपेड वॉलेटमध्ये जमा करता येऊ शकते. मात्र दर महिन्याच्या रिचार्जवर कोणतीही कॅप नसेल.

किती वाहनांना एक टॅग वापरू शकतो?

तुम्ही तुमच्या दोन किंवा अधिक वाहनांसाठी एकच टॅग वापरू शकणार नाही. त्यामुळे प्रत्येक वाहनासाठी तुम्हाला वेगळा फास्टॅग रजिस्टर करणे बंधनकारक आहे.

IHMCL च्या वेबसाईटवर नमूद केलेल्या माहितीनुसार टोल नाक्याच्या 10 किमीच्या परिसरात तुमचे मूळ वास्तव्याचे ठिकाण असेल तर तुम्हाला टोलमध्ये सूट मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या बँकेकडे निवासाचा पत्ता पडताळून घेणे आवश्यक असले. ही पडताळणी झाल्यास तुमच्या फास्टॅगमध्ये तसे नमूद करण्यात येईल, ज्यामुळे तुम्हाला टोल माफ केला जाईल.

आपली प्रतिक्रिया द्या