‘फाफे’ची धम्माल आणि कम्माल

वैष्णवी कानविंदे-पिंगे, मुंबई

फास्टर फेणे म्हणजे तोच तो उचापती मुलगा, जो आपण शाळेत असताना आपल्या सोबत त्याच्या पुस्तकातनं भेटत गेला. फुरसुंगीच्या फास्टर फेणेच्या करामती वाचत वाचतच कित्येक मराठी मुलं मोठी झाली आणि हा बन्या त्यांच्या गळय़ातला अक्षरश: ताईत झाला. बनेश अगदी आपल्या सारखाच मुलगा. त्याचे घरचेही ‘‘बन्या, सांभाळून रे’’ वगैरे आपल्याला आपले घरचे जसं सांगतात अगदी तसेच, पण त्याच्या तुडतुडय़ा पायांचा वेग, त्याची सायकल, त्याची चलाख बुद्धी, गुन्हेगारीचा येणारा वास आणि मनापासनं कोणासाठी काहीतरी करायची धडपड सगळं कसं आकर्षक होतं. त्यामुळे हा फेणे कायमचा मनात रुजला आणि आता हाच फास्टर फेणे त्याचं पेटंट ‘टॉक’ घेऊन पुन्हा एकदा चंदेरी पडद्यावर आलाय आणि फास्टर फेणेचा हा नवा अवतारदेखील तितकाच भारावून टाकणारा आहे.

मुळात ‘फास्टर फेणे’च्या लेखन मालिकेवर मालिकाही आली होती आणि तीदेखील तितकीच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे बहुतेक मराठी जनांना हा फास्टर फेणे ठाऊक आहे. त्याच्या वाचलेल्या किंवा टीव्हीवर पाहिलेल्यांपैकी कोणत्या करामती पडद्यावर पाहायला मिळणार याची उत्सुकता जास्त होती, पण दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी फास्टर फेणेला आजच्या युगातलं बनवलंय. आपल्या बरोबरच मोठा झालेला ‘फाफे’ आता वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करतोय आणि तो २०१७ चा युवक असल्याने या काळाप्रमाणे त्याची स्टाईल, त्याचा तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी गोष्टींचा तो सर्रास अवलंब करतोय. त्याच्या अवतीभोवतीच्या समस्यादेखील अगदी आजच्या आहेत. हे सगळं ‘फास्टर फेणे’च्या आपण वाचलेल्या पुस्तकांमध्ये कुठेही नसलं तरीही हा जसा आपल्या बालपणी लहानपणीचा ‘फाफे’ भावला होता अगदी तसाच पडद्यावरचा आजच्या काळाचा ‘फाफे’ही तितकाच भावतो आणि अगदी सहज आपण त्याच्या साहसाचे एक भाग होऊन जातो. दिग्दर्शक अजय सरपोतदार आणि लेखक क्षितिज पटवर्धन यांनी केलेल्या या फेरबदलामुळे हा सिनेमा जबरदस्त उभा राहिला आहे. आठवणी जपणारा फास्टर फेणे आणि त्याची नवी करकरीत गोष्ट.. तीही काळासोबत धावणारी. फास्टर फेणेसारखाच विचार करून खेळलेल्या या हुशार खेळीसाठी या दोघांचं कौतुक करावं तितकं थोडं.

तर या नव्या ‘फाफे’ची गोष्ट थोडक्यात ती अशी…सध्या बनेश्वर या गावी राहणाऱ्या बनेश फेणेला पुण्याला येऊन वैद्यकीय प्रवेश परीक्षा द्यायचीय. त्यासाठी तो पुण्यात येतो. पुण्यात ओळखीने भा. रा. भागवत नामक लेखक आजोबांच्या घरी राहतो. त्याच्या साहसी स्वभावाला अनुसरून नेमकी त्याच्यासमोर एकेक आव्हानं यायला लागतात. परीक्षेला जाताना त्याची गाठ एका हुशार विद्यार्थ्याशी होते. त्यांची चटकन मैत्री होते, पण परीक्षेनंतर भेट होऊ शकत नाही. चुटपुटणाऱ्या बनेशला धक्का बसतो ते त्या हुशार मित्राने आत्महत्या केल्याचं वृत्त ऐकून. मग त्या मित्राबाबत नेमकं काय झालं असावं ही शोधमोहीम तो स्वीकारतो आणि त्या निमित्ताने गुन्हेगारीची खोलवर रुतलेली पाळंमुळं सापडायला लागतात, एकेक पदर उलगडायला लागतात आणि अगदी सुरुवातीपासनं शेवटापर्यंत सिनेमा प्रेक्षकाला घट्ट पकडून ठेवतो.

उत्तम लेखन, हुशार दिग्दर्शन, चोख अभिनय, उत्कृष्ट संकलन अशा गोष्टी जर एकत्र जमून आल्या तर किती कसदार कलाकृती वाटय़ाला येऊ शकते याचंच ‘फास्टर फेणे’ हे खास उदाहरण. यात सर्वच बाबी कसदार आहेत, पण व्यक्तिरेखांवर आधारित सिनेमा असल्याने त्याच्याविषयी सगळय़ात आधी बोललं पाहिजे. तर मुळ ‘फास्टर फेणे’तली फक्त फास्टर फेणे ही एकच व्यक्तिरेखा घेतलीय आणि बाकी सगळी पात्रं लेखकाने नव्याने रंगवली आहेत. तर ‘फास्टर फेणे’चे लेखक भा. रा. भागवत यांना या चक्क व्यक्तिरेखा म्हणून उभं करायचं एक वेगळं कसब लेखकाने दाखवलंय. खरंच या लेखकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एखाद्या सुप्रसिद्ध पुस्तकावर, तेदेखील त्यावर आधीच पडद्यावर तितकीच प्रसिद्ध मालिका असताना नव्याने नव्या धाटणीत लिहिणं हे अत्यंत कठीण असतं. मुख्य म्हणजे यात तुलना होते आणि पारडं वरखाली व्हायला लागतं. या सगळय़ा गोष्टींचा चोख विचार करून पटवर्धन यांनी ही कथा लिहिलीय. यात फास्टर फेणेचा स्वभाव, त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या आवडी निवडी सगळं आहे. तरीही हे सगळं नवं आहे आणि अतिशय सखोल विचार करून पुस्तकातल्या आणि नव्याची बेमालूम सरमिसळ करून उभं केलंय.

दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेले आजोबा अतिशय छान. किंचित विक्षिप्त, लेखकू स्वभावाचे, मिश्किल आणि तरुण पिढीशी चटकन नाळ जुळेल असे हे आजोबा एकदम आवडून जातात. आणि ज्यांनी फास्टर फेणे साकारलाय तो लेखक असाच असेल असंही मनोमन वाटून जातं. पर्ण पेठेंनी साकारलेली पत्रकार किंवा लहानग्या शुभम मोरेंनी नेटकं काम केलंय. रिक्षावाला अंबादास साकारणारा सिद्धार्थ जाधव किंवा छोटय़ाशा भूमिकेतली चिन्मयी सुमितही ‘फाफे’ची आई म्हणून चटकन आवडून जातात. गिरीश जोशी यांनी साकारलेला नकारात्मक भुमिकेतील आप्पा म्हणजे कमालच. त्यांची संवादफेक करायची पद्धत असो, हसण्याची लकब असो किंवा फाटक्या अवतारात समोरच्याला धमकी द्यायचा नूर असो, सगळं अफलातून. या माणसाची भीती वाटून जाते आणि हा व्हिलन सिनेमात मुद्दाम उभा केलेला दुष्ट माणूस न वाटता प्रत्यक्षातही अशा वृत्तीची माणसं आपल्या आजूबाजूला आहेत हे लक्षात येतं आणि आणखीच अस्वस्थ व्हायला होतं. गिरीश कुलकर्णी कसलेला अभिनेता आहे आणि भक्कम हीरोसमोर त्याच्या रूपाने तितकाच तोडीस तोड व्हिलन उभा राहिल्याने सिनेमाची खेळीची लज्जत वाढली आहे.

सगळय़ात महत्त्वाच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचं तर तो फास्टर ऊर्फ बनेश फेणे. मुळात अमेय वाघकडे पाहिल्यावर आपण इतकी वर्षे मनात रंगवलेली फास्टर फेणेची प्रतिमा जशीच्या तशी अशीच असेल असं ठामपणे वाटून जातं (अर्थात एकेकाळी हे सुमित राघवनबद्दलही वाटलं होतं), पण अमेय वाघ हा लाजवाब कलाकार आहे. त्याने ‘फास्टर फेणे’चं चॅलेंज लीलया पेललंय. त्याच्या सगळय़ा लकबी स्वीकारत तो मुलगा मोठा झाल्यावर कसा असेल हे अगदी नेमकेपणाने उभं केलंय. किंबहुना त्याच्यामुळेच आपल्या मनातल्या ‘फाफे’च्या व्यक्तिरेखेला आकार आलाय असं म्हणणं जराही अतिशयोक्तीचं नाही.

या सिनेमाची पटकथा नेमकी, कुठेही फाफटपसारा न करता मांडलेली आणि म्हणूनच खिळवून ठेवणारी. लॉजिक आणि तंत्रज्ञान या गोष्टींचा नेमका वापर करून ही कथा मांडल्यामुळे पडद्यावरची प्रत्येक गोष्ट पटत जाते. नाहीतर हीरो आहे म्हणून त्याला सगळं माफ असं कुठेही होत नाही. संवाद हेदेखील या सिनेमाच्या यशातलं महत्त्वाचं पान. लेखक आजोबांचे वैचारिक, पण तरीही तरुणाईशी जुळवून घेणारे संवाद, फास्टर फेणेच्या तोंडची वाक्यं आणि त्यातनं डोकावणारी त्याची हुशारी, त्याचा स्वभाव, लहानग्या भुभूचं त्याच्या परिस्थितीला अनुसरून असलेलं बोलणं आणि आप्पाची अंगावर काटा आणणारी लकब, त्याचे संवाद या प्रत्येकाच्या बोलण्यात वेगळेपण आहे आणि नेमकेपणही. त्यामुळे या सिनेमातला जिवंतपणा शेवटापर्यंत कायम राहतो.

दिग्दर्शन कसदार आहेच. सुरुवातीचं दृष्यं. नंतर ते विसरायला लावून त्याची थेट शेवटाकडे घातलेली सांगड, फास्टर फेणेची प्रेक्षक मनावर बसणारी पकड, दृष्यं कितीही फिल्मी असली तरीही ती खरी आहेत हे प्रेक्षकाला पटवून देण्याचं काम दिग्दर्शकाने मस्तच केलंय आणि त्याचा साथ लाभलीय ती उत्कृष्ट संकलनाची, चपखल ध्वनीची आणि प्रकाश योजनेचा खूप छान वापर करून घेतलेल्या छायांकनाची. काळोखातली दृष्यं असोत, लखलखणारं पुणं असो, ट्रफिकचा रस्ता असो किंवा सुनसान जंगलातलं दृष्य, छायांकन आणि ध्वनीच्या माध्यमातनं ही दृष्यं अतिशय प्रभावीपणे उभी राहिली आहेत.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट, या सिनेमाची गोष्ट थ्रिलर असली, करमणूकप्रधान असली तरीही वरवरची नाही. या सिनेमाच्या आणि फास्टर फेणे व्यक्तिरेखेच्या माध्यमातनं आजच्या जगाचा एक अत्यंत गंभीर प्रश्न समोर मांडलाय आणि तो प्रश्न कसा पसरत चाललाय याचं सखोल विश्लेषणही केलंय. हा सिनेमा नुसती करमणूक करत नाही तर विचारही करायला लावतो. फास्टर फेणे ही व्यक्तिरेखा घेऊन चौकटीच्या पलीकडे सिनेमा बनवायच्या या प्रयत्नाचं मनापासनं कौतुक.

जसा अक्षय कुमारचा ‘बेबी’ किंवा तापसी पन्नूचा ‘नाम शबाना’ आपली उत्कंठता घट्ट धरून ठेवतो तितक्याच खमकेपणे ‘फास्टर फेणे’ उभा राहिलाय. जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करण्यासाठी, नव्या खमंग गोष्टीचा आस्वाद घेण्यासाठी, नव्या दमाच्या रसरशीत टीमचं उत्तम जुळून आलेलं काम पाहण्यासाठी ‘फास्टर फेणे’ प्रत्येकाने पाहायलाच हवा आणि सिनेमा संपल्यावर ‘टॉक्क’ करत मनापासनं दाद द्यायलाच हवी.

दर्जा : ४ स्टार
सिनेमा : फास्टर फेणे
निर्माता : रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, मंगेश कुलकर्णी
दिग्दर्शक : आदित्य सरपोतदार
कथा/पटकथा/संवाद : क्षितिज पटवर्धन
छायांकन : मिलिंद जोग
संकलन : फैजल महाडिक, इम्रान महाडिक
कलाकार : अमेय वाघ, पर्ण पेठे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, शुभम मोरे, चिन्मयी सुमित, अंशुमन मोरे, ओम भुतकर, श्रीकांत यादव, सिद्धार्थ जाधव.