अवजड वाहतूकीविरोधात अजित म्हात्रे यांचे बेमुदत उपोषण

383

आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संघटनेतर्फे अजित म्हात्रे यांनी अवजड वाहतूक बंद करण्यासाठी सोमवारपासून दिघोडे फाटा येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला अनेक सामाजिक संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे.  दास्तान फाटा ते दिघोडे आणि गव्हाणफाटा ते दिघोडे या दोन मार्गावरील अवजड वाहतूक आणि बेकायदा पार्कींग बंद करावी अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे.

दिघोडे ते दास्तान फाटा हा रस्ता अत्यंत खराब झाला असून रस्त्यावर दुचाकी अथवा लहान वाहन चालविणे अवघड झाले आहे. दररोज हजारो विद्यार्थी आणि नागरीक या रस्त्यावरून प्रवास करतात. मात्र, रस्त्यातील मोठे खड्डे आणि अवजड वाहनांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण होते. अनेकदा वाहतूक कोंडी होवून नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा  खोळंबा होतो. तसेच अपघात होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी होत आहे. त्याचप्रमाणे दिघोडे ते गव्हाणफाटा या मार्गावर दोन्ही बाजूला अवजड वाहने पार्कींग केलेली असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होवून नागरिकांना त्रास होतो आणि अपघात घडतात. त्यामुळे या मार्गावर अवैध पार्कींग केलेल्या वाहनांवर करावाई करावी आणि गर्दीच्या वेळेस या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हे आंदोलन मागे घ्यावे यासाठी उरणचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक जगदीश कुलकर्णी आणि वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक माणिक नलावडे यांनी मध्यस्ती करून आंदोलन मागे घेण्यासाठी विनवणी केली. मात्र आंदोलनकर्त्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. या आंदोलनाला माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथ ठाकूर, पागोटेचे सरपंच भार्गव पाटील, राजू मुंबईकर आणि रिक्षाचालक व नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या