धक्कादायक…आठ दिवसांच्या उपवासानंतर केली पत्नीची हत्या; नरबळीचा संशय

नवरात्रीनिमित्त आठ दिवस उपवास केलेल्या पतीने अष्टमीच्या रात्री पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छत्तीगडच्या अंबिकापूरमध्ये ही घटना घडली आहे. आरोपीच्या पत्नीचा मृतदेह देवघरात आढळल्याने ही घटना नरबळीची असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही नरबळीची घटना असावी, अशा संशय व्यक्त केला आहे. आगर साय असे आरोपीचे नाव असून तो तांत्रिकाचे काम करत असल्याने पोलिसांचा संशय बळावला आहे.

छत्तीगडच्या अंबिकापूर शहराजवळ असलेल्या सरगवा गावात शनिवारी सकाळी आगर साय यांच्या घरातील देवखोलीत त्यांच्या पत्नीचा मृतदेह आढळला. मृतदेहावर सहासात वार करण्यात आले होते. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. महिलेची हत्या तिच्या नवऱ्याने केल्याचा संशय असल्याने पोलिसांनी आगर साय याला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही घटना नरबळीची असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आगरने नवरात्रीनिमित्त आठ दिवस उपवास केले होते. त्यानंतर अष्टमीच्या रात्री त्याने पत्नीची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिसांनी आगरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी असता त्याने अनेकदा जबाब बदलले आहेत. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने आपण तिची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रात्री आपल्या घरी पाहुणे आले होते. रात्रीचे जेवण झाल्यावर सर्वजण झोपले. सकाळी आपली सून देवघरात गेली असता तिला आपल्या पत्नीचा मृतदेह आढळल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबूी दिली. मात्र, तो सातत्याने जबाब बदलत असल्याने पोलिसांसमोर अडचणी आहेत. गुन्हा कबूल केल्याने त्याला अटक करून चौकशी करण्यात येत आहे.

रात्री आपल्या घरात काही संशयित शिरले होते, त्यांनी आपल्या पत्नीची हत्या केल्याचे सांगत त्याने जबाब बदलला. त्यानंतर आपण आठ दिवस उपवास केल्याने रात्री बकऱ्याचा बळी दिल्याचे सांगितले. पत्नीच्या हत्येशी आपला संबंध नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने आपल्याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याचे सांगत तिची हत्या केल्याचे सांगितले. आरोपी सारखे जबाब बदलत आहे. मात्र, यातील कोणत्याही जबाबात तथ्य आढळत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोपी पत्नीला नेहमी मारहाण करत होता. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात भांडणे होत होती. तसेच त्याने आपण बकऱ्याचा बळी दिल्याचे म्हटले आहे. त्याने आठ दिवस उपवास केले होते. तसेच अष्टमीच्या रात्री त्याच्या पत्नीची हत्या झाली आहे. देवघराची पाहणी केल्यानंतर आणि त्याच्या पत्नीच्या शरीरावरील वार पाहता ही नरबळीची घटना असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणी सर्व पैलूंचा विचार करत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या