सावत्र आई आणि बापाच्या मारहाणीत 10 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

1279
girl-child

दुसऱ्या पत्नीच्या मदतीने स्वतःच्या 10 वर्षाच्या मुलीला जबर मारहाण करून पित्यानेच तिला ठार केल्याची घटना सांगलीतील वाळवा येथे घडली आहे. याप्रकरणी नराधम पित्यासह सावत्र आईला आष्टा पोलिसांनी अटक केली आहे. शोकाकूल वातावरणात मुलीच्या पार्थिवावर गावकर्‍यांनी अंत्यसंस्कार केले.

सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे राहणाऱ्या ख्वाजा मोमीन आणि त्याची दुसरी पत्नी आसमा हे दोघेही मोमीनच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या सुहाना या मुलीला मारहाण करुन सतत तिचा छळ करत होते. आईचा मृत्यू झाल्याने सुहाना वडील आणि सावत्र आईबरोबर राहत होती. पलूस येथील मदरसा शाळेतून काढून वडिलांनी तिला गावातच आपल्या घरात ठेवले होते. सावत्र आई आसमा तिला वारंवार मारहाण करत होती. बुधवारी रात्री सावत्र आई आसमा आणि वडील ख्वाजा यांनी तिला जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे ती जागीच कोसळली. ती झोपल्याचे समजून आसमा आणि ख्वाजाही झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ख्वाजा द्राक्षबागेच्या कामासाठी निघून गेला. सुहाना जागची हलेना म्हणून आसमा हीने नवर्‍याला बोलावून घेतलं तेव्हा रात्री केलेल्या मारहाणीत सुहानाचा जागीच मृत्यू झाल्याचे उघडकीस आले.

या प्रकरणी तातडीने गावकऱ्यांनी आष्टा पोलिसांना कळविताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नराधम बापासह सावत्र आईला अटक केली. संपूर्ण वाळवा गावातील लोकांच्या मनाला चटका लावणारी ही घटना घडल्याने गावावर मोठी शोककळा पसरली होती. पोलिसांनी या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या ताब्यात दिला. त्यानंतर गावकऱ्यांनी अत्यंत शोकाकूल वातावरणात मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

आपली प्रतिक्रिया द्या