गृहपाठ केला नाही म्हणून 12 वर्षांच्या मुलाला वडिलांनी जिवंत जाळले

शाळेतून दिलेला गृहपाठ न केल्याने वडिलांनी आपल्या 12 वर्षाच्या मुलाची जिवंत जाळुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाकिस्तानातील कराची शहरात घडलेल्या या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, ही घटना 14 सप्टेंबर रोजी कराचीच्या औरंगी टाऊन हाऊस भागात घडली, या घटनेची माहिती आता समोर आली आहे. नजीर असे आरोपी वडिलांचे नाव आहे. तर शाहीर असे मुलाचे नाव आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, नजीरचा मुलगा शाहीर गृहपाठ करत नव्हता. याचा राग येऊन वडिलांनी 12 वर्षीय शाहिरवर रॉकेल ओतून त्याला पेटवून दिले. यात तो मुलगा भाजल्याने त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. नजीरच्या पत्नीने त्याच्यावर मुलाच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या आठवड्यात 19 सप्टेंबर रोजी नजीरला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शाहिरच्या आईने सांगितले की, ‘मला बरे वाटत नसल्याने मी औषध घेऊन आत झोपले होते. मुलं अभ्यास करत असताना अचानक ओरडण्याचा आवाज आला मी आले आणि पाहिले की माझा मुलगा जळत आहे. मी माझ्या मुलाची अवस्था पाहिली आणि मी ओरडतच राहिले. तेव्हा माझी अवस्था काय झाली असेल याची तुम्ही कल्पना करा. नजीर नेहमी म्हणायचा की जोपर्यंत मी त्याचे पाय जाळत नाही, तोपर्यंत तो सुधारणार नाही. आता माझा मुलगा या जगातूनच गेला आहे.’

पोलिसांना नजीरने सांगितले की, मुलाची हत्या करण्याचा माझा हेतू नव्हता. मला त्याला फक्त घाबरवायचे होते, कारण तो शाळेचा गृहपाठ करत नव्हता. मी त्याच्या अंगावर रॉकेल ओतले आणि काडी पेटवताच त्याच्या शरीराने पेट घेतला. क्षणार्धात तो आगीच्या ज्वाळांमध्ये भस्मसात झाला.