नव्वद टक्के गुणांचा आनंद साजरा करायला आज वडील हयात नाहीत याचीच खंत

2846

मी सीए व्हावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे मी आठवीपासूनच गणितावर अधिक जोर दिला. कसून अभ्यास करत दहावीमध्ये ९२ टक्के गुण मिळवले. बारावीच्या शिक्षणासाठी परिस्थिती अभावी रत्नागिरीत गोगटे जोगळेकरला प्रवेश घेतला आणि वसतीगृहात राहून अभ्यास करत दहावी सारखेच बारावीत यश मिळविण्याचा निश्चयच केला होता. प्रामाणिकपणे अभ्यास करुन मला वाणिज्य शाखेत ९० टक्के गुण मिळाले खरे, मात्र चारच दिवसांपूर्वी माझे बाबा अचानक गेले. निकाल ऐकायला माझे बाबा आज हयात नाहीत याची खंत वाटत असल्याचे पोर्णिमा श्रीनिवास विरकर हिने आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

श्रीनिवास विरकर हे गणपतीपुळे देवस्थानमध्ये सेवेत होते. मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद देण्याचे काम ते करीत. त्यांची पत्नी रजनी ही संस्थानमध्ये लाडू तयार करण्याचे काम करते. या जोडप्याची पोर्णिमा ही एकुलती एक मुलगी. श्रीनिवास विरकर हे स्वभावाने मनमिळाऊ आणि पापभिरु व्यक्तीमत्व असल्याने देवस्थानच्या कर्मचाऱ्यांसह संस्था पदाधिकाऱ्यातही लोकप्रिय होते. आपली मुलगी हुशार असल्याने तिला सीए करायचे, असा त्यांचा ध्यास होता.

पोर्णिमाने देखील दहावीत कमालीचा अभ्यास करत मालगुंड येथील बळीराम परकर विद्यालयातून चक्क ९२ टक्के गुण मिळवले. विरकर दांपत्याची परिस्थिती बेताची असली तरीही मुलीला शिकवण्यासाठी वाट्टेल तेवढे परिश्रम करण्याची विरकर दांपत्याची तयारी होती. त्यासाठी हे दांपत्य सुट्टीच्या दिवशीही काम करत असे. पोर्णिमासाठी गोगटे जोगळेकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेऊन तिची मुलींच्या वसतीगृहात रहाण्याची व्यवस्था केली.

सलग दोन वर्षे प्रचंड मेहनत घेऊन पोर्णिमाने अभ्यास केला. बारावीची परीक्षा मनासारखी पार पडली. बारावीत नव्वद टक्के गुण मिळणार याची तिला खात्रीच होती. सर्व काही आनंदात सुरु होते. २३ वर्षे गणपतीपुळे संस्थान मध्ये काम करुन पै पै साठवून जमलेल्या पैशातून विरकर दांपत्याने शिवने ता. संगमेश्वर येथे गतवर्षी घर बांधले होते. पुढील वर्षी निवृत्त झाल्यानंतर शिवने येथे येवून रहाण्याचा त्यांचा मनसूबा होता.

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पोर्णिमा बारावीचा निकाल लागण्याची वाट पहात असतांनाच ९ जुलैला पोर्णिमाचे वडील आजारी पडले. त्यांना रत्नागिरी येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दोन दिवस उपचार केल्यानंतर त्यांचा आजार गुंतागुंतीचा असल्याने डॉक्टरनी त्यांना घरी नेण्यास सांगितले. पत्नीने जड अंत:करणाने शिवने येथे गतवर्षी बांधलेल्या घरात त्यांना आणले. ११ ते १३ जुलै या दोन दिवसात गणपतीपुळे येथून अनेक सुहृद श्रीनिवास विरकर यांना भेटायला आले. यावरुनच त्यांनी तेथे काय स्थान निर्माण केले होते हे स्पष्ट झाले.

अखेरीस श्रीनिवास विरकर यांचे १३ जुलै रोजी सायंकाळी निधन झाले. या घटनेने पोर्णिमाला अश्रू अनावर झाले. ज्यांच्यासाठी खूप अभ्यास केला तेच राहिले नाहीत म्हणून पोर्णिमा निराश झाली खरी मात्र हताश नाही झाली. या कालावधीतही ती सी ए फाऊंडेशनच्या ऑनलाईन परीक्षा देतच होती. आज बारावीचा निकाल आला आणि पोर्णिमाला वाणिज्य शाखेत चक्क ९० टक्के गुण मिळाल्याचे कळले. मात्र या गुणांचा आनंद घ्यायला वडिल हयात नसल्याने पोर्णिमाच्या चेहऱ्यावर मात्र आनंद पसरु शकला नाही. मात्र वडिलांसाठी मी नक्की सीए होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्दीने नव्याने उभी राहीन असे सांगून तिने आईला घट्ट मिठी मारुन आपल्या अश्रूंना वाट मोकळी करुन दिली .

आपली प्रतिक्रिया द्या