चिरतरुण राहण्यासाठी त्याला लागतं आपल्याच मुलाचं रक्त, वाचा काय आहे हा प्रकार

महाभारतात ययाति या राजाची गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकली असेल. चिरतरुण राहण्यासाठी त्याने आपल्याच मुलाकडे त्याचं तारुण्य मागितलं होतं. काहीसा असाच प्रकार एका बापलेकाच्या बाबतीत घडला आहे.

कॅलिफोर्निया येथे राहणारा वालेब्रायन जॉन्सन नावाचा 45 वर्षांचा माणूस आपल्या तारुण्यासठी दर वर्षी जवळपास 16 कोटी रुपये खर्च करतो. स्वतः एका कंपनीचा मालक असलेला जॉन्सन यासाठी वेगळा आहार, पोषक तत्व आणि औषधांचा समावेश त्याच्या जीवनशैलीत करतो. त्याने प्रोजेक्ट ब्ल्यूप्रिंट नावाने एक योजना सुरू केली आहे. त्याचा उद्देश शरीरातील 70 अवयवांचं जैविक वय कमी करणं हा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचं हृदय हे 37 वर्षांच्या माणसाचं, त्वचा 28 वर्षांच्या तरुणासारखी तर फुफ्फुसं आणि तंदुरुस्ती ही 18 वर्षांच्या मुलाची आहे.

त्यासाठी जॉन्सनने एक भन्नाट प्रयोग केला आहे. काही काळापूर्वी जॉन्सन, त्याचा मुलगा टॅल्मेज आणि वडील रिचर्ड यांच्यासह एका क्लिनिकमध्ये गेला होता. तिथे त्याच्या मुलाचं सुमारे 1 लीटर इतकं रक्त काढलं गेलं. त्या रक्तातील घटक उदा. लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स, द्रवरुपातील प्लाझ्मा वेगळा केला गेला. तो प्लाझ्मा जॉन्सनच्या शरीरात चढवण्यासाठी त्याचंही रक्त काढलं गेलं. मग त्याला टॅल्मेजचं रक्त चढवण्यात आलं. तर जॉन्सनचं रक्त वरील कृतीनेच त्याच्या वडिलांच्या शरीरात चढवलं गेलं.

थोडक्यात तीन पिढ्यांच्या रक्ताची अदलाबदल करण्यात आली. त्यानंतर आपल्या शरीरात फरक पडल्याचं जॉन्सनचं म्हणणं आहे. दुसरीकडे हा प्रकार भयानक असून जैविक वय कमी करण्यासाठी असा उपाय अस्तित्वात नसल्याचं तसेच त्यामुळे भयंकर परिणाम होऊ शकतात, असा इशारा काही तज्ज्ञांनी दिला आहे.