अल्पवयीन मुलीवर बापाने केला बलात्कार, गरोदर झाली म्हणून केली हत्या

2573

आपल्याच पोटच्या मुलीवर तिच्या बापाने वारंवार बलात्कार केल्याची घटना राजस्थान येथील अलवरमध्ये घडली आहे. मुलगी गर्भवती झाल्याने बिंग फुटेल या भीतीने बापाने तिची हत्या केल्याचंही या घटनेत उघड झालं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अलवर येथील नीमराणा येथे 10 मे रोजी एका 16 वर्षांच्या मुलीच्या मृत्युची बातमी स्थानिक पोलिसांना मिळाली. तिचा मृत्यू अनैसर्गिकरित्या झाल्याची तक्रार तिच्या एका नातेवाईकाने केली होती. त्यावरून पोलीस तिच्या आई वडिलांकडे चौकशी करण्यासाठी गेले. आई-वडिलांनी तिचे अंत्यसंस्कार झाल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यावरून संशयाने पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली, तेव्हा एक भयंकर सत्य त्यांना कळलं.

ही 16 वर्षांची मुलगी तिच्या कुटुंबासोबत नीमराणा गावात राहत होती. तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं. दारूच्या नशेत अनेक वेळा पीडितेवर त्याने बलात्कार केला होता. गेले अनेक महिने तिचं लैंगिक शोषण सुरू होतं. या दरम्यान पीडिता गर्भवती राहिली. त्यामुळे समाजात बदनामी होईल, या भीतीने 10 मे रोजी तिच्या वडिलांनी तिची गळा दाबून हत्या केली. तिची हत्या लपवण्यासाठी आणि पुरावे नष्ट व्हावेत म्हणून त्याने तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कारही केले.

गंभीर म्हणजे, मुलीची हत्या करण्यात त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिल्याचं चौकशीत उघड झालं आहे. पोलिसांनी पुराव्यादाखल मुलींच्या अस्थींचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून तिच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी तिच्या आई-वडील दोघांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या