धक्कादायक! कोरोनाच्या भीतीपोटी आई-वडिलांसह दोन अल्पवयीन मुलांची आत्महत्या

देशातील कोरोना विषाणूची दुसरी लाट हळूहळू ओसरत असली तरी कुटुंबातील सदस्यांसह आजूबाजूला होणारे मृत्यू पाहून सर्वसामान्य लोक भीतीच्या सावटात आहेत. या लाटेचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावरही झाला असून याचा प्रत्यय आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) राज्यातील कुर्नूल (Kurnool) जिल्ह्यातील वड्डेगेरी (Vaddegeri) येथे घडलेल्या घटनेवरून येतो. येथे एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी कोरोनाच्या भीतीपोटी मृत्यूला कवटाळले.

प्रताप (वय -42), हेमलता (वय – 36), जयंत (वय – 17) आणि रिशिता (वय – 14) अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नी व दोन अल्पवयीन मुलांची नावे आहेत. चौघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केली.

‘इंडिया टूडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, प्रताप हे टीव्ही मॅकॅनिक होते तर पत्नी हेमलता हाऊसवाईफ होत्या. मुलगा जयंत महाविद्यालयात शिक्षण घेत होता, तर मुलगी सातव्या इयत्तेमध्ये शिकत होती. मंगळवारी सकाळी घरातून कोणताही आवाज येत नसल्याचे पाहून शेजाऱ्यांनी दार वाजवून पाहिले. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पोलिसांना फोन करून माहिती दिली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता चौघांचे मृतदेह घरात आढळून आले. मृतदेहांशेजारी पोलिसांना एक सुसाईड नोटही मिळाली आहे. सुसाईड नोटवरून मित्र आणि नातेवाईकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने व आपल्यालाही कोरोनाची लागण होईल यामुळे मानसिक तणावात होते. या तणावातच चौघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी केस दाखल केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या