विमुक्ता : निर्भय पत्रकारिता लोकशाहीचा आधारस्तंभ  मरिया रेसा

>>डॉ. ज्योती धर्माधिकारी

मरिया रेसा या नोबेल पारितोषिक विजेत्या पत्रकार. फिलिपाइन्स देशाच्या हुकूमशाही सत्तेविरुद्ध तेथील अध्यक्ष रोडरिगो डय़ुटरटे यांच्यावर मरिया यांनी आपल्या लेखांमधून कायम हल्ला केला. लोकशाहीची बूज राखण्यासाठी पत्रकारांनी निर्भयपणे लिहीत राहिले पाहिजे, हाच संदेश त्या देतात. 

‘‘पत्रकार बंधू-भगिनींनो, सत्याचे, तत्त्वनिष्ठतेचे आणि लोकशाहीचे दोर धरून ठेवा, नाहीतर संपूर्ण लोकशाही व्यवस्थेलाच धोका निर्माण होईल’’… मरिया रेसा या नोबेल पारितोषिक विजेत्या पत्रकार आपल्या भाषणांमधून आणि पुस्तकांमधून वारंवार जगाला संदेश देत असतात. नुकतेच त्यांचे ‘हाऊ टू स्टॅन्डअप टू डिक्टेटर’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

फिलिपिनो-अमेरिकन नागरिक असलेल्या मरिया रेसा यांनी पत्रकारितेच्या कक्षा रुंदावत नेल्या, असे युनेस्कोने म्हटले आहे. लोकशाहीचा खरा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता. मात्र फक्त हिंदुस्थानमध्येच नव्हे, तर जगभरातील मोठमोठय़ा वर्तमानपत्रे आणि समाजमाध्यमांना सरकारी संस्था बातम्या पुरवत असतात. या बातम्या जनसामान्यांपर्यंत सरकारला पाहिजे असलेला संदेश पोहोचवण्याचा खटाटोप करतात. त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया हा जास्त भ्रष्ट आहे, असे मरिया म्हणतात.

फिलिपाइन्स देशाच्या हुकूमशाही सत्तेविरुद्ध तेथील अध्यक्ष रोडरिगो डय़ुटरटे यांच्यावर मरिया यांनी आपल्या लेखांमधून कायम हल्ला केला. तेथील हुकूमशाही व्यवस्थेच्या त्या कडव्या विरोधक आहेत. ‘रॅपलर’ हे ऑनलाइन वृत्तपत्र सुरू करून त्यांनी फिलिपाइन्स देशाच्या राज्यव्यवस्थेवर, सरकारी धोरणांवर ताशेरे ओढले. मरिया यांची लेखणी तलवारीपेक्षा जास्त तळपते. त्यांच्या शब्दांचा, लेखांचा भाषणांचा वचक फिलिपाइन्स देशात पाहायला मिळतो. केवळ फिलिपाइन्सच कशाला, जगभरातल्या लोकशाही व्यवस्थेसाठी काम करणाऱया पत्रकारांना मरिया एकत्रित आणून लोकशाहीची बूज राखण्यासाठी पत्रकारांनी निर्भयपणे लिहीत राहिले पाहिजे, असे सांगते. अर्थातच व्यवस्थेच्या विरुद्ध लिहिणाऱयांचे काय होते, हे त्यांना माहीत आहे. अनेक पत्रकारांनी आपला जीव गमावलेला आहे. तरीही जीवाची बाजी लावून आपण घेतलेले पत्रकारितेचे व्रत सोडू नये, असे मरिया म्हणतात. ‘रॅपलर’ हे ऑनलाइन वृत्तपत्र सुरू करून त्यांनी आपला लढा सुरू ठेवला आहे.

रेसाचा जन्म (2 ऑक्टोबर 1963) मनिला, फिलिपाइन्स येथे झाला. त्या फिलिपाइन्स-अमेरिकन नागरिक आहेत. वयाच्या नवव्या वर्षी त्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. मात्र, शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या पुन्हा फिलिपाइन्स देशात परतल्या. ‘सीएनएन’ या वृत्तपत्रासाठी त्यांनी जवळ जवळ वीस वर्षे काम केले. दक्षिण आशियाई देशातील शोध पत्रकारितेसाठी त्यांनी येथील अनेक देश, घटना, युद्ध, उठाव, चळवळीचे वार्तांकन ‘सीएनएन’ला पुरवले. दक्षिण आशियाई देशांत पह्फावत जाणाऱया अतिरेकी कारवाया आणि मूलतत्त्ववाद्यांचे प्राबल्य यांचा त्यांनी पर्दाफाश केला. अनेकदा अत्यंत नकारात्मक बातम्या देत राहिल्याची जाणीव त्यांना आहे. त्यांनी कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये चांगले काम करणारे नागरिक शोधून काढून त्यांच्यावरही लिहिले. आपल्या लेखणीतून जगाला सातत्याने ‘आंखों देखा’ चित्र पुरवणाऱया मरियांना आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान आहे.

‘रॅपलर’ची स्थापना झाल्यानंतर त्यांनी खोटय़ा बातम्या पसरवणाऱया सरकारांविरुद्ध जगभरातील लोकशाही पूजक पत्रकारांना एकत्र करून प्रतिकार केला. त्यांच्या मते सरकार त्यांना अनुकूल अशा बातम्या मुद्दाम वृत्तपत्र संस्थांना पाठवत असते. या बातम्या खोटारडय़ा आणि चुकीचे चित्र निर्माण करणाऱया असतात. त्यांच्या या उपक्रमामुळे आणि फिलिपाइन्स देशातील हुकूमशाही व्यवस्थेविरुद्ध सातत्याने बोलत राहिल्यामुळे ‘टाईम’ मासिकाने त्यांना 2018 चा ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’साठी निवडले. ‘रॅपलर’ या ऑनलाइन वृत्तपत्रातून विल्फ्रेडो केन्ग या धनाढय़ उद्योगपतीची बदनामी केल्याप्रकरणी त्यांना 13 फेब्रुवारी 2019 रोजी सायबर गुन्हेअंतर्गत अटक करण्यात आली. 15 जून 2020 ला त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला आणि त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास झाला. पत्रकारांवर होणाऱया या अन्यायकारक निवाडय़ाच्या विरोधात जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते, जागतिक पत्रकार परिषदेचे सदस्य यांनी या आदेशाचा प्रखर विरोध केला. पत्रकारिता ही स्वतंत्र असली पाहिजे आणि स्वतंत्रपणे बोलणाऱया पत्रकारांच्या विरोधात अशा प्रकारे अन्याय, अत्याचार खपवून घेतले जाणार नाही, असे सांगणारा गट निर्माण झाला. अर्थातच, मरिया यांना सोडण्यात आले. तत्कालीन अध्यक्ष रोडरिगो यांच्याविरुद्ध सातत्याने बोलत राहिल्यामुळे त्यांना राजकीय हेतूने खोटय़ा गुह्यात फसवले गेले, असे अनेक पत्रकारांचे मत आहे. याच अनुषंगाने माहिती आणि लोकशाही आयोगाच्या एका संस्थेमध्ये ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’च्या 25 मानद सदस्यांपैकी मरिया याही एक आहेत.

त्यांना विविध पुरस्कारांनी पुरस्कृत करण्यात आले, पण सर्वोच्च पुरस्कार म्हणजे गेल्या वर्षी 2021 मध्ये त्यांना ‘लोकशाही आणि दीर्घकालीन शांतीसाठी आवश्यक असलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी’ नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांच्यासोबत रूसचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह यांनाही शांततेचे नोबेल पारितोषिक दिले. आज घडीला मरिया रेसा यांच्यावर 11 गुन्हे दाखल आहेत. त्यातल्या काही गुह्यांच्या अंतर्गत त्यांना जीवनभर पैद ठोठावली जाऊ शकते. तरीही निर्भयपणे आणि सातत्याने मरिया आपले काम करत आहेत.

जगभरातील पत्रकारांना संदेश देताना त्या म्हणतात, तत्त्वनिष्ठतेची आणि लोकशाहीचा दोर पकडून ठेवली पाहिजे. त्यासोबत येणाऱया सर्व धोक्यांची जाणीव असली तरीही आपण कर्तव्य करत राहिले पाहिजे. त्या पुढे सांगतात, आपला मुद्दा मांडण्यासाठी तुम्हाला वास्तविकता माहीत असली पाहिजे. तुमच्याकडे जर वास्तविकता नसेल तर तुमच्याकडे सत्य नसेल आणि जर तुमच्याकडे सत्य नसेल तर तुम्ही लोकांचा विश्वास संपादन करू शकणार नाही. वास्तविकता, सत्य आणि विश्वास या तीन गोष्टींवर लोकशाही उभी असते. मरिया रेसा यांनी अनेक पुस्तके लिहून त्यांचे म्हणणे जगभरातील लोकशाहीवादी लोकांपर्यंत पोहोचवले आहे. भ्रष्ट पत्रकारितेमध्ये पत्रकारांचा, त्याहून इलेक्ट्रानिक संस्थांचा बराच वरचा क्रमांक लागतो, असे मरिया रेसा म्हणतात. ऑनलाइन वृत्तपत्र माध्यमे आणि समाज माध्यमे यांच्यावर मरिया रेसा कडाडून हल्ला करतात.

अर्थात, निर्भय पत्रकारितेला जगभरातून मागणी आहे हेच मरिया रेसा यांना मिळालेले पुरस्कार आणि सर्वोच्च नोबेल पुरस्कार सिद्ध करतात. निर्भय पत्रकारितेला समाजमनाचे, मानवाधिकार कार्यकर्त्यांचे अभय असते हेही मरिया रेसा यांच्या उदाहरणातून पटते.

[email protected]