फेडरेशन कप पुरुष-महिला कबड्डी स्पर्धा – स्पर्धेची गटवारी जाहीर

30
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । कराड

भारतीय कबड्डी महासंघ व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमान पदाखाली दि. ९ ते १२ फेब्रु. २०१८ या कालावधीत होणाऱ्या फेडरेशन कप पुरुष-महिला कबड्डी स्पर्धेची गटवारी जाहीर करण्यात आली.

मुंबईतील एस.आर.पी. मैदान, पश्र्चिम द्रुतगती महामार्ग, जोगेश्वरी (पूर्व) येथे खेळविण्यात येणाऱ्या या स्पर्धेत खेळणाऱ्या संघाची दोन-दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत ११वर्षांनंतर विजेतेपद मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा अ गटात समावेश आहे. तर उपउपांत्य फेरीतच गटांगळ्या खाणाऱ्या महिला संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेकरिता मॅटची दोन क्रीडांगणे तयार करण्यात आली आली असून एक महिलाकरिता, तर एक पुरुषांकरिता तयार करण्यात आले आहे. सर्व सामने सायंकाळच्या सत्रात प्रखर विद्युत झोतात खेळविण्यात येणार असून क्रीडा रसिकांसाठी ५ हजार प्रेक्षक क्षमतेची गॅलरी उभारण्यात आली आहे.

या स्पर्धेत बक्षिसांची खैरात करण्यात आली असून खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. सर्व खेळाडूंना उत्तम अशा हॉटेलमध्ये उतरविण्यात आले आहे. स्पर्धेची तयारी जवळ जवळ पूर्ण होत आली असून मुंबई उपनगर कबड्डी असो.चे अध्यक्ष खासदार गजानन किर्तीकर यांनी याची आज पहाणी केली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या असून या स्पर्धा आयोजनात कोणतीही कसूर राहू नये म्हणून कीर्तीकर व त्यांची संपूर्ण टीम या सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत.

या स्पर्धेची गटवारी खालील प्रमाणे.
पुरुष विभाग :-
अ गट :- १) महाराष्ट्र, २) हरियाणा, ३) राजस्थान, ४) उत्तर प्रदेश
ब गट :- १) सेनादल, २) कर्नाटक, ३) उत्तराखंड, ४) भारतीय रेल्वे.
महिला विभाग :-
अ गट :- १) हिमाचल प्रदेश, २) पंजाब, ३) उत्तर प्रदेश, ४) छत्तीसगड.
ब गट :- १) भारतीय रेल्वे, २) हरियाणा, ३) केरळ, ४) महाराष्ट्र.

या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ” कबड्डी युनिव्हर्स ” वर करण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यांचा आनंद कबड्डीप्रेमींना घर बसल्यासुद्धा घेता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या