मुंबईत आजपासून फेडरेशन कप, कबड्डी कबड्डीचा दम घुमणार

22

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या यजमानपदाखाली आणि अॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया व महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने जोगेश्वरीमध्ये उद्यापासून फेडरेशन कप कबड्डी… कबड्डीचा दम घुमणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून स्पर्धेतील विजेत्यांना शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. शिवसेना नेते-खासदार गजानन कीर्तिकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धेतील लढती जोगेश्वरी (पूर्व) येथील एसआरपी ग्राऊंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग येथे खेळवण्यात येतील. महाराष्ट्राच्या पुरुषांच्या संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा रिशांक देवाडिगाकडे सोपवण्यात आले असून सायली जाधव महिला संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे.

स्पर्धेचा उद्घाटन सोहळा शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, इंटरनॅशनल कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष जनार्दनसिंह गेहलोत, अॅमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा मृदुल भदोरिया, सरकार्यवाह दिनेश पटेल, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. किशोर पाटील, कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथ्रीकर, सरकार्यवाह अॅड. आस्वाद पाटील, मुंबईचे महापौर प्रिन्सिपल विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना नेते मनोहर जोशी, सुधीर जोशी, अॅड. लीलाधर डाके, पर्यावरणमंत्री रामदास कदम या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल.

या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा शिवसेना नेते-परिवहनमंत्री दिवाकर रावते, केंद्रीय मंत्री अनंत गीते, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, खासदार आनंदराव अडसूळ व खासदार चंद्रकांत खैरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत पार पडेल. या स्पर्धेत समस्त हिंदुस्थानातून १९२ खेळाडू, ३६ पंच, १६ संघव्यवस्थापक तसेच २० क्रीडा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या स्पर्धेच्या लढतीत १३ बाय १० मीटर आकाराच्या सिंथेटीक ट्रॅकवर होणार आहेत.

कबड्डी रसिकांकरिता खूशखबर आहे. या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण ‘कबड्डी युनिव्हर्स’ वर करण्यात येणार आहे. त्यामुळे या सामन्यांचा आनंद कबड्डीप्रेमींना घर बसल्यासुद्धा घेता येणार आहे.

या स्पर्धेत बक्षिसांचा वर्षाव करण्यात येणार असून खेळाडूंच्या निवास व भोजन व्यवस्थेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत केल्या असून या आयोजनात कोणतीही कसूर कमी पडू नये म्हणून मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष खासदार गजानन कीर्तिकर व त्यांची संपूर्ण टीम या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहेत.

महाराष्ट्राचे संघ खालीलप्रमाणे
पुरुष संघ : १) रिशांक देवाडिगा – संघनायक (मुंबई उपनगर), २) विकास काळे (पुणे), ३) विशाल माने (मुंबई शहर), ४) नितीन मदने (सांगली), ५) गिरीश इरनाक (ठाणे), ६) कृष्णा मदने (सांगली), ७) शिवराज जाधव (पुणे), ८) ऋतुराज कोरवी (कोल्हापूर), ९) विराज लांडगे (पुणे), १०) नीलेश साळुंखे (ठाणे), ११) रवींद्र ढगे (जालना), १२) तुषार पाटील (कोल्हापूर).

प्रशिक्षक : डॉ. माणिक राठोड (संभाजीनगर) , व्यवस्थापक : फिरोज पठाण (सातारा).

महिला संघ : १) सायली जाधव (मुंबई उपनगर), २) अभिलाषा म्हात्रे (मुंबई उपनगर), ३) सुवर्णा बारटक्के (मुंबई शहर), ४) कोमल देवकर (मुंबई उपनगर), ५) स्नेहल शिंदे (पुणे), ६) सायली केरीपाळे (पुणे), ७) ललिता घरट (रत्नागिरी), ८) पूजा शेलार (पुणे), ९) चैताली बोराडे (ठाणे), १०) तेजस्विनी पाटेकर ( मुंबई उपनगर), ११) श्रद्धा पवार ( रत्नागिरी), १२) आम्रपाली गलांडे (पुणे).

प्रशिक्षक : सुहास जोशी ( मुं. उपनगर ), व्यवस्थापिका : हिमाली ढोलम (मुंबई उपनगर).
या स्पर्धेची गटवारे

पुरुष विभाग : ‘अ’ गट : १) महाराष्ट्र, २) हरयाणा, ३) राजस्थान, ४) उत्तर प्रदेश.
‘ब’ गट : १) सेनादल, २) कर्नाटक ३) उत्तराखंड, ४) हिंदुस्थानी रेल्वे.

महिला विभाग : ‘अ’ गट ः १) हिमाचल प्रदेश, २) पंजाब, ३) उत्तर प्रदेश ४) छत्तीसगड.
‘ब’ गट : १) हिंदुस्थानी रेल्वे, २) हरयाणा, ३) केरळ, ४) महाराष्ट्र.

आपली प्रतिक्रिया द्या