वाईट वाटतं रे! व्हीव्हीएस लक्ष्मणने ट्विटद्वारे व्यक्त केली खंत

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण याने वॉशिंग्टन सुंदरबद्दल वाईट वाटतं असं म्हटलं आहे. इंग्लंडविरूद्ध सुरू असलेल्या अंतिम कसोटी सामन्यात शतकाच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या वॉशिंग्टन सुंदर याला शतक झळकावता आले नाही. शेवटपर्यंत नाबाद राहूनही त्याला कसोटी कारकिर्दीतील पहिलं वहिलं शतक झळकावण्याची संधी मिळाली नाही.

लक्ष्मण याने एका ट्विटद्वारे म्हटलंय की “मला वॉशिंग्टन सुंदरबाबत खरंच वाईट वाटतं. मात्र त्याने ज्या पद्धतीने आज फलंदाजी केली आणि संघासाठी जे अमूल्य योगदान दिलं त्याबद्दल त्याला नक्की अभिमान वाटत असेल. मला खात्री आहे की त्याला शतक झळकावण्याची त्याला आणखी संधी नक्की मिळेल”

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लक्ष्मण याने म्हटले की या युवा क्रिकेपटूबद्दल मला खरंच वाईट वाटतं. संघाला गरज असताना आणि प्रचंड तणाव असतानाही त्याने ही खेळी साकारली. प्रचंड ताण असतानाही चांगली खेळी खेळल्याची ही त्याची पहिली वेळ नाहीये. पहिल्या कसोटी सामन्यामध्येही तुम्ही त्याची खेळी पाहिली आहे.

शुक्रवारचा खेळ संपला तेव्हा वॉशिंग्टन सुंदर याच्या 60 धावा झाल्या होत्या. शनिवारी खेळ सुरू झाल्यानंतर सुंदर याने जिथे गरजेचे असतील तिथे मोठे फटके मारले आणि जिथे सांभाळून खेळण्याची गरज होती, तिथे सांभाळून खेळणं पसंत केलं. यामुळे तो 96 धावांपर्यंत मजल मारू शकला. रिषभ पंत बाद झाल्यानंतर अक्षर पटेल, इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज हे फलंदाजीसाठी आले होते. अक्षर पटेल बाद झाल्यानंतर सुंदरला एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नाही. इशांत शर्मा आणि सिराज हे दोघेही शून्यावर बाद झाल्याने सुंदरचं शतक झळकावण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.

आपली प्रतिक्रिया द्या