‘क्रिकेट ऑस्ट्रेलियाची वागणूक अपमानास्पद’, WTC फायनलपूर्वी डेव्हिड वॉर्नरची खंत

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलपूर्वी ऑस्ट्रेलियन क्रिकेट वर्तुळामध्ये खळबळ उडाली आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने क्रिकेट ऑस्ट्रेलियावर आपला राग काढत जोरदार टीका केली आहे. सिडनी हेराल्डला दिलेल्या मुलाखतीत वॉर्नर म्हणाला की, ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने माझी कर्णधारपदावरील बंदी ज्या पद्धतीने हाताळली आहे, ते अपमानास्पद आहे. हे प्रकरण निकाली काढण्याऐवजी बोर्डाने ते आणखी लांबवले जे माझ्यासाठी अत्यंत निराशाजनक आहे. असे अजिबात होऊ नये.

खरं तर, 2018 साली वॉर्नरवर कर्णधारपदावरून आजीवन बंदी घालण्यात आली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या आचारसंहितेत काही बदल केले असले, तरी त्याअंतर्गत वॉर्नरवर घातलेली बंदी उठवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याच्या अपीलवर बोर्डाने अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही.

येवेळी मुलाखतीत वॉर्नर म्हणाला की, ‘या संपूर्ण प्रकरणामुळे मी माझ्या खेळावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. कसोटी सामन्यादरम्यान मला सतत फोन यायचे आणि खेळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी मला वकिलांशी बोलायला लागायचे. हे माझ्यासाठी अपमानास्पद असून मी खूप निराश आहे.

वॉर्नरने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अपील दाखल केले होते. या अपीलमध्ये वॉर्नरने त्याच्यावर लावलेली कर्णधारपदाची बंदी उठवण्यात यावी, अशी मागणी केली होती. या संपूर्ण प्रकरणावर आपले म्हणणे मांडताना वॉर्नर म्हणाला होता की, ‘मला अपमानित करण्याचा त्यांचा हेतू होता. पॅनेलने माझे अपील इन-कॅमेरा ऐकावे अशी माझी इच्छा होती, परंतु त्यांना याची सार्वजनिकपणे चर्चा करायची होती. जे अजिबात योग्य नाही.

डेव्हिड वॉर्नरवर बंदी का आली?

हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे, जेव्हा ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. या दौऱ्यातच सँड पेपर गेटची घटना घडली. या घटनेत कॅमेरून बॅनक्रॉफ्ट चेंडूवर काहीतरी घासताना दिसला. या संपूर्ण प्रकरणात तो बॉल टॅम्परिंगमध्ये सामील होता आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरही यात सामील असल्याचे दिसून आले.

त्या काळात स्मिथ आणि वॉर्नर ऑस्ट्रेलियन संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार होते. यानंतर दोघांवर एक वर्षाची तर बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. या बंदीमध्ये वॉर्नरच्या कर्णधारपदावर आजीवन बंदी घालण्यात आली होती.