सरकारी खड्ड्यांनी घेतला नवी मुंबईच्या तरुणीचा बळी, ग्रामस्थांचे रास्ता रोको

19

सामना प्रतिनिधी, पनवेल

मुंबई-गोवा महामार्गावरील सरकारी खड्ड्यांनी आज नवी मुंबईतील एका तरुणीचा बळी घेतला. पनवेलकडे दुचाकीवरून येत असताना तारा गावाजवळ खड्डे बुजविण्यासाठी टाकलेल्या खडीवरून तिची गाडी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरने तिला चिरडले. भाग्यश्री शिंदे (२८) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून दीड तास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे या महामार्गावर ७ ते ८ किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या.

अजून किती बळी हवेत?
या अपघाताचे वृत्त कळताच तारा, बांधणवाडी तसेच कल्ले गावातील हजारो ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखून धरला. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त गावकऱ्यांनी सरकारच्या नावाने शिमगा केला. या महामार्गावर पडलेल्या असंख्य खड्ड्य़ांमुळे रोज प्रवाशांचे बळी जात आहेत. त्यांची कुटुंबे अनाथ होत आहेत. हे पाप सरकारचे आहे. राज्यकर्त्यांना अजून किती बळी हवेत, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी केला. दरम्यान, घटनेनंतर फरारी झालेल्या कंटेनरचालकाला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबईतील घणसोली येथे राहणारी भाग्यश्री शिंदे ही ठाण्यात खोपट येथे नोकरी करते. आपली नवी ऍवेंजर ही दुचाकी घेऊन ती गुरुवारी पेण येथील मैत्रिणीकडे गेली होती. आज सकाळी ती पेण येथून ठाण्याकडे येण्याकरिता दुचाकीवरून निघाली. मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी असंख्य जीवघेणे खड्डे पडले आहेत. पनवेलच्या तारा गावाजवळ युसूफ मेहेरअली सेंटरसमोर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी खडी पसरून टाकण्यात आली होती. या खडीवरून तिची बाईक घसरली. दुर्दैवाने त्याचवेळी मागून भरधाव कंटेनर आल्याने भाग्यश्री त्याखाली चिरडली गेली. हा अपघात इतका भीषण होता की भाग्यश्रीचा जागीच या घटनेत मृत्यू झाला.

हे आधीच्या सरकारचे पाप!
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची सध्या झालेली दुरवस्था आणि पडलेले खड्डे हे आधीच्या सरकारचे पाप असल्याचे सांगत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी हात झटकले आहेत. ते आज मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून गणेशोत्सवात हा महामार्ग खड्डेमुक्त करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते, पण ते फोल ठरले. गेल्या काही दिवसांत महामार्गावरील खड्डय़ांनी अनेक वाहनचालकांचा बळी घेतला. यावर गडकरी यांनी हे आधीच्या सरकारचे पाप असल्याचे सांगितले. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सरकारने १२ हजार कोटींचे पॅकेज दिले आहे. यासाठी आवश्यक असलेले ८० टक्के जमीन हस्तांतरण पूर्ण झाले आहे. कशेडी घाटाच्या टेंडरची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे डिसेंबर २०१८ पर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या