महिला उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना एजंट कडून मारहाण

13

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

एआरटीओ कार्यालय परिसरात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे आणि त्यांच्या शासकीय वाहन चालकाला आज मारहाण झाल्याची घटना घडली. दुपारी १२.३० वाजता क्षुल्लक कारणावरून एजंट सतिष किसन पवार, रंगनाथ किसन पवार आणि दीपक किसन पवार या तिघांनी मारहाण केल्याची तक्रार दुतोंडे यांनी दिल्याची माहिती ठाणेदार शिवाजी कांबळे यांनी दिली. मारहाणीनंतर जयश्री दुतोंडे यांना जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यता आली असून एक आरोपी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असून त्याने देखील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे.

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दुतोंडे आज जेव्हा कार्यालयात पोहोचल्या. तेव्हा त्यांच्या गाडीचालकासोबत सतिष पवार आणि रंगनाथ पवार या दोघांनी वादविवाद करून मारहाण केला. यावेळी जयश्री दुतोंडे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना आणि गाडीचालकाला सतिष, रंगनाथ आणि दीपक पवार या तिघा भावांनी जबर मारहाण केली. त्यानंतर जयश्री दुतोंडे यांनी पोलीस ठाण्याला पवार बंधूविरोधात तक्रार नोंदविली आहे. दुसरीकडे सतिष पवार यानेही जयश्री दुतोंडे यांच्या विरोधात जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. आपल्याला जयश्री दुतोंडे आणि त्यांच्या स्विय सहाय्यकांनी मारहाण केल्याचा आरोप पवार याने केला आहे. त्यालाही रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पोलिसांनी दोन्ही तक्रारींची चौकशी करुन गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेने एआरटीओ कार्यालय परिसरात खळबळ उडाली असून जयश्री दुतोंडे यांना भेटण्यासाठी इतर एजंट, कर्मचारी तसेच शहरातील स्नेहीमंडळींनी एकच गर्दी केली आहे. पोलिसांनी दीपक पवार आणि रंगनाथ पवार या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर सतिष पवार हा जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती आहे. सतिष पवार याने दाखल केलेल्या तक्रारीवरुन आरटीओ जयश्री दुतोंडे यांचेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.