लातूर महिला तस्करी रॅकेटमध्ये कॉग्रेसची महिला कार्यकता

90

सामना ऑनलाईन । लातूर

लातूर जिल्ह्यातून वर्षभरात जवळपास ३०० महिला आणि मुली गायब झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. लातूरमध्ये महिलांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केला. याप्रकरणी दहा जणांना अटक केली असून यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्या पूनम शहाणेचाही समावेश आहे. पूनम शहाणे गेल्या १५ वर्षांपासून महिलांच्या तस्करीचं रॅकेट चालवत असल्याचा आरोप कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी विधानसभेत केला आहे. तसेच या महिलेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही निलंगेकरांनी यावेळी केली.

महाराष्ट्रात १४ जिल्ह्यात या टोळीचं नेटवर्क पसरलं असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. १ जुलैला लातूरमधून अकरा वर्षांची मुलगी गायब झाल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसात केली होती. पण २५ दिवस मुलीचा शोध लागला नव्हता. या मुलीला सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या ३४ वर्षीय उमेश मानेला विकण्यात आलं होतं. पंचवीसाव्या दिवशी संधी साधून मुलीनं कुटुंबाला फोन केल्यावर ही बाब उजेडात आली आणि या टोळीचा पितळ उघडं पडलं. ३ ते ४ लाखात ही टोळी मुलींचा सौदा करत असे. गेल्या वर्षभरात एकूण ३०० महिला आणि मुली जिल्ह्यातून गायब झाल्याच्या तक्रारी पोलिसात दाखल करण्यात आल्या आहेत. ही घटना गंभीर असून घटनेचे पडसाद विधीमंडळातही उमटले.

दरम्यान, कुणालाही पाठीशी न घालता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी विधानसभेत केली. तसेच कुणासोबत फोटो काढल्याने ती व्यक्ती त्या पक्षाची होत नाही. त्यामुळे याचा संबध कोणत्या पक्षाशी जोडणे योग्य नाही”, असं अजित पवार म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या