निसर्गातील स्त्रीरूपे

97

डॉ. सुरुची पांडे

निसर्गातील स्त्रीरूपे शोधताना संपूर्ण पृथ्वी हीच मुळी ‘माता’ असल्याची संकल्पना संपन्न हिंदुस्थानी तत्त्वचिंतनाने दिली आहे, हे आपण सर्वप्रथम ध्यानात घेतले पाहिजे. ‘स्त्री’ शब्दाचा अर्थ, संस्कृतातील ‘सू’ म्हणजे सृजनाशी संबंध आहे. बहुधा ‘सूत्री’ अथवा ‘सोत्री’ शब्दांपासून स्त्री शब्द आला असावा आणि अर्थातच ‘स्त्री’देखील मनुष्यच आहे. ‘निरुक्त’ या संस्कृत ग्रंथात मनुष्य शब्दाचा अर्थ स्पष्ट करताना ‘‘विचार करून जे आपली कामे पार पाडतात त्यांना मनुष्य म्हटले जाते,’’ अशी व्याख्या आढळते. या व्याख्येनुसार जायचं झाल्यास समाजात कितीजण मनुष्य म्हटले जाऊ शकतात, याचा विचार करायला हरकत नाही.

आपण जर खरे मनुष्य असू तर ‘पृथ्वी’ या स्त्रीरूपाकडे आपण संवेदनशील दृष्टीने पाहू. वेदांपासून ‘मही माते’चे उल्लेख सापडतात. पृथ्वीवर खणून काही काम करावयाचे असल्यास आधी पृथ्वीची प्रार्थना आणि क्षमायाचना केल्याचा संदर्भ अथर्ववेदात मिळतो. त्या संस्कृत संदर्भात ऋषी म्हणतात की, ‘‘हे भूमी! ज्या ठिकाणी मी खोदकाम करणार आहे, तेथील जागा लवकरच प्राणतत्त्वाने भरून जाऊ देत. तुझ्या मर्मावर माझ्याकडून आघात न होवो. तुझ्या हृदयाला माझ्याकडून पीडा न पोहोचो.’’

अरुणाचल प्रदेशातील एक जनजातीमध्ये अशा प्रकारच्या अर्थाची प्रार्थना आजही जमिनीवर काही काम सुरू करण्याआधी केली जाते. हिंदुस्थानी मूर्तिशास्त्रात भूदेवीची मूर्ती घडविताना काही सुंदर लक्षणे दिली गेली. ‘भूमि’ अथवा ‘भूदेवी’ ही विष्णूचीही एक पत्नी आहे. बहुधा वराह अवताराच्या रुपकातून हा संबंध स्थापित झाला असावा. या भूमिदेवीचा रंग भातशेतीतील कोवळ्या अंकुरांप्रमाणे फिका हिरवा असतो. तिचे वस्त्र पिवळ्या रंगाचे असते. तिच्या हातांमध्ये कमळ असते. विष्णूधर्मोत्तर पुराणात भूदेवीचे वणंन वेगळे आहे. त्या वर्णनानुसार ती शुभ्र आहे; तिला चार हात आहेत. एका हातात रत्नांचे पात्र आहे, दुसऱया हातात भाजीपाल्याचे भरलेले पात्र आहे, तिसऱ्या हातात औषधी वनस्पतींनी भरलेले पात्र आहे आणि चौथ्या हातात कमल आहे. ही भूदेवीची मूर्ती ‘स्वयं प्रधान’ म्हणजे स्वतंत्र पूजनीय असे स्त्रीरूप आहे.

निसर्गातील आणखी महत्त्वाचे स्त्रीरूप म्हणजे जीवनवाहिनी असलेल्या सर्व नद्या आणि पाण्याचे स्रोत. साती आसरा देवी आजही खेडोपाडी नद्यांच्या वा जलकुंडांच्या जवळ आढळतात. नदीदेवतांशी जोडली गेलेली वाहने म्हणजे जलचर आहेत, जे त्यांच्याच आश्रयाने राहतात. एखाददुसरे उदाहरणच आपण पाहू या. गंगा नदी आणि देवीरूपाचे वाहन मानले गेले आहे मगर. तशा मूर्तीही प्राचीनकाळापासून आढळतात. त्यात मोठे उदात्त असे प्रतीक-तत्त्वज्ञान आहे. मगर हे शक्ती, सामर्थ्याचे प्रतीक आहे. या शक्तीवर गंगेचे विवेकबुद्धीचे स्त्रीरूप आरूढ आहे; भोगांमधून मुक्त होऊ पाहणाऱ्या जीवाचे प्रतीक मगर आहे म्हणून तो मुक्त श्वास घेण्यासाठी वैचारिक प्रदूषणाच्या जगातून डोकं वर काढतो. मगर कामशक्तीचं प्रतीक आहे. कामशक्तीवर नियंत्रण, संयम असेल ती सुंदर, उन्नत रूपात व्यक्त होऊ शकते. हे उन्नयन करण्यासाठी गंगेचे सात्विक स्त्रीरूप मगरावर आरूढ असते.

सरस्वती ही नदी आहे,देवी आहे आणि वाक्शक्ती आहे. वैदिक वाङ्मयात ही एक महानदी म्हणून आपल्याला सापडते. ती जलसमृद्ध, अन्नदात्री, कल्याणकारी असल्याचे उल्लेख आढळतात. तिचे वाहन शुभ्र हंस मानले गेले. ‘हंस’ हे सूर्याचेही एक नाव आहे. म्हणजेच हंस हे प्रकाशवान बुद्धीचं प्रतीक आहे. पाण्यात हंस गतिमान असतो; तसंच आपल्या बुद्धीनंही गतिशील, संपन्न होत राहिलं पाहिजे. साचलेल्या पाण्यासारखी बुद्धी निरुपयोगी होऊ लागते. नदीरूपा सरस्वती ही सत्य आणि प्रिय वचन बोलण्याची प्रेरणा देणारी देवी आहे. ती वाक्शक्ती आहे.

निसर्गात जिथे जिथे शक्तीचं, पंचमहाभूतांच्या सामर्थ्याचं एकत्रीकरण दिसून येतं, तिथे तिथे स्त्रीरूप देवीची कल्पना मांडली गेली. तिची काही रूपं सौम्य तर काही उग्र असतात. ही स्त्रीरूपं शब्दलक्ष्मीच्या पाऊलखुणा सांगणारी असतात. ध्वनी, जल, वायू, भावना, दृश्य अशा असंख्य ठिकाणी आज जीवघेणं प्रदूषण आहे. या प्रदूषणांच्या मुळाशी वैचारिक प्रदूषण आहे. त्यातून भूदेवीला बाहेर काढायचं असेल तर प्रत्येक स्त्री-पुरुषातील विष्णूशक्तीने म्हणजेच विवेकीशक्तीने एकजुटीचे रूप धारण करायला हवे.

आपली प्रतिक्रिया द्या