चांगलं पीक येण्यासाठी लावणी आधी ‘सात महोत्सव’

61

नरेश जाधव । खर्डी

लांबणीवर पडलेल्या वरुण राजाने गेल्या आठवड्यापासून सर्वत्र हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. चांगल्या पावसामुळे भातरोपंही तरारल्याने शेतकर्‍यांना आता लावणीचे वेध लागले आहेत. त्यामुळे या वर्षी चांगले पीक येऊ दे.. यासाठी शेतकरी ठिकठिकाणी शेतावर ‘सात’ ही अनोखी पूजा घालत आहेत. शहापुरातील बांदाबांदांवर ही पूजाअर्चा सुरू असून या ‘सात महोत्सवा’तून शेतकरी पर्जन्य आणि ग्रामदेवतेला साकडे घालत आहेत.

शेतकर्‍याच्या जीवनात आनंद पेरणार्‍या अनेक पारंपरिक प्रथा, चालीरिती आजही सुरू असून लावणीला सुरुवात करण्यापूर्वी सर्व गावकरी मिळून ‘सात’ साजरी करण्याची अनोखी पद्धत शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात वर्षानुवर्षे जपली जात आहे. जूनमध्ये पावसाचा अंदाज घेऊन पेरलेली भातरोपे लावणीसाठी तयार झाली की आवणीला सुरुवात होते. मात्र त्यापूर्वी सर्व गावकरी वर्गणी काढून ग्रामदेवतेला व पर्जन्यदेवाला खूश करण्यासाठी ‘सात’ नावाचा उत्सव साजरा करतात.
बरेच शेतकरी शेतावरील शेतदेवाला शेंदूर लावून नारळ फोडतात किंवा नारळाची वाटी (सुके खोबरे) मोडून मगच लावणीला सुरुवात करतात. या प्रथेमुळे शेतकरी शेतात काम करण्यापूर्वी मानसिकदृष्ट्या निश्चित होत असल्याने ही प्रथा आमच्या पूर्वजांसह आम्हीही आनंदाने पाळत असल्याचे बाळू वीर हे शेतकरी सांगतात.

सर्वात आधी भातांची रोपे आलेल्या बेलवड, अजनुप, दहिगाव, जरंडी, दळखण, विहिगाव, वेळूक, वाशाळा, सावरोली, बेलकडी, गांगणवाडी परिसरातील शेतकरी ‘सात’ नावाची पूजाअर्चा करतात. मंगळवारचा मुहूर्त साधत शहापूर तालुक्यातील बर्‍याच शेतकर्‍यांनी ‘सात’ साजरी केली. त्यामुळे बुधवारपासूनच भात लावणीला सुरुवात झाली. या महोत्सवामुळे सर्व शेतकरी एकत्र येतात. त्यामुळे एकमेकांच्या अडचणी कळतात. यातूनच नांगर, बैल, बदली मजूर अशी शेतीच्या कामात एकमेकांना मदत होते असे विठोबा धसाडे या शेतकर्‍याने सांगितले.

‘बळीचा बकरा’ ते ‘मलिदा’

पूर्वी ‘सात महोत्सव’ साजरा करताना ग्रामीण भागात ग्रामदेवतेसमोर बोकड तसेच कोंबड्यांचा बळी दिला जायचा. त्यानंतर त्याचे वाटे करून गावकर्‍यांना दिले जायचे. परंतु आता ही अघोरी प्रथा बंद होऊ लागली आहे. भात लावणीला सुरुवात केल्यानंतर कुटुंबातील कुणाही व्यक्तीला सर्पदंश, विंचूदंश होऊ नये, आजारपण बळावू नये, जनावरे आजारी पडू नयेत व चांगले पीक यावे याकरिता आता गावकरी एकत्र जमून ग्रामदेवतेसमोर तांदळाच्या भाकरी व गुळाचा नैवेद्य ठेवतात.या भाकरींचे तुकडे करून गूळ मिसळून तो प्रसाद सर्वांना वाटला जातो. त्याला मलिदा असे म्हणतात.

आपली प्रतिक्रिया द्या