6 मे रोजी चिंदर येथील भगवती माऊलीचा उत्सव 

मालवण तालुक्यातील चिंदर येथील श्री देवी भगवती माऊली पुनःप्रतिष्ठापना सातवा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, 6 मे रोजी आयोजित केला आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक,  सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे.

सकाळी 8 ते दुपारी  1 या वेळेत श्री गणपती पूजन, श्री भगवती देवीवर अभिषेक, नवचंडी होमहवन, आरती, नैवेद्य आदी कार्यक्रम होतील. दुपारी 1 वाजता महाप्रसाद तर सायंकाळी 4 ते 6 या वेळेत हळदीकुंकू समारंभ होईल. रात्री 9 वाजता हितचिंतक, देणगीदार आणि मान्यवरांचा सत्कार करण्यात येईल. रात्री 10 वाजता पै. बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटय़मंडळ-नेरूर यांचा ‘चोर झाला धनाचा अधिपती’ या दशावतारी नाटकाचा प्रयोग होईल. या नाटय़प्रयोगामध्ये 14 ट्रिकसीन सादर होणार असून कुबेर या प्रमुख भूमिकेत आबा कलिंगण आहेत. श्री देवी भगवती माऊली रंगमंच-चिंदर भटवाडी येथे कार्यक्रम होईल. भाविकांनी मोठय़ा संख्येने या सोहळय़ाला उपस्थित राहण्याचे आवाहन विठ्ठल पाताडे (बारापाच मानकरी, चिंदर), महादेव घाडी (भगवती स्थळकर, चिंदर), श्री देवी भगवती माऊली सेवा समिती, चिंदर, श्री देवी भगवती उत्साही मंडळ-चिंदर भटवाडी आणि चिंदर भटवाडी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई यांनी केले आहे.