काबुलमध्ये कारबॉम्बस्फोटात सात ठार

522

हिंदुस्थानी दूतावासाजवळ स्फोट

अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी आणखी एक मोठा धमाका झाला. येथील पोलीस डिस्ट्रिक्ट-15 च्या कसाबा भागात सकाळी साडेसात वाजता एका कारमध्ये झालेल्या जोरदार बॉम्बस्फोटात सातजण मरण पावले असून अन्य सातजण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे आजूबाजूच्या काही वाहनांचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले असून जवळील इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या. हा कार बॉम्बस्फोट काबुलमधील हिंदुस्थानी दूतावासाजवळ झाला असला तरी दूतावासातील हिंदुस्थानी कर्मचारी सुखरूप असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नसल्याचे आंतरिक मंत्रालयाचे प्रवक्ते नसरत रहिमी यांनी सांगितले.

हा बॉम्बस्फोट कारमध्ये बसलेल्या एका आत्मघाती दहशतवाद्याने घडवून आणला असावा असा अंदाज आहे. विशेष म्हणजे आदल्याच दिवशी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी तीन खतरनाक दहशतवाद्यांना सोडण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे सरकारी वाहनांना टार्गेट करून हा स्फोट घडविण्यात आला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. सोडून देण्यात आलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक अनास हक्कानी हाही आहे. त्याला 2014 मध्ये पकडण्यात आले होते. तो तालिबानी संघटनेच्या हक्कानी नेटवर्कचा प्रमुख होता.

आपली प्रतिक्रिया द्या