पावसाच्या पाण्याचा शेततळ्यात संचय, हिंगोलीच्या राज्य राखीव दलाच्या वसाहतीत उपक्रम

521

हिंगोली येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या वसाहतीत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदा पावसातुन पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या थेंबाचे नियोजन करत 4 कोटी लीटर पाण्याचा संचय सहा शेततळ्यांत करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही सहा शेततळी तुडूंब भरल्याची माहिती राज्य राखीव पोलीस दल गटाचे समादेशक मंचक इप्पर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

हिंगोली येथील राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 12च्या वसाहतीत आयोजित पत्रकार परिषदेत इप्पर बोलत होते. यावेळी सहायक समादेशक रविंद्र जाधव यांची उपस्थिती होती. राज्य राखीव बलाचे जवानाचे मनोबल उंचावण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात असून, यात पथदर्शी प्रकल्प म्हणून यंदा वसाहतीत सात शेततळी खोदण्यात आली आहेत. वसाहतीतील निवासस्थानावरील तसेच वसाहतीत पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे पाणी शेततळ्यात साठवले जाणार आहे. या माध्यमाने 4 कोटी लिटर पाण्याचा संचय केला जाणार असून हे पाणी शेतीच्या उपयोगासाठी देण्याचे नियोजन केले जाणार आहे. यासाठी सात शेततळी खोदण्यात आली असून यातील सहा शेततळे तुडूंब भरली आहेत. वसाहतीत पंधरा हजार वृक्षलागवडीचा संकल्प असून प्रत्येक वृक्षाचे संगोपन करण्यासाठी जवानाच्या कुटूंबीयांना प्रेरीत केले आहे. या वृक्षांना दर आठवड्याला पाणी पुरविले जाईल याचे नियोजन केले आहे.

वसाहतीत मधमाशांचा प्रकल्प उभारण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य राखीव दलातील जवानांच्या मुलांसाठी संगणक क्लासेस वसाहतीतच सुरू करण्यात आले असून या संगणक क्लासेसमध्ये सध्या 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याच बरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी विशेष क्लासेस सुरू करण्यात आले आहे. वसाहतीतील चार जवान या क्लासेसमध्ये शिकवणी घेत आहत. वसाहतीतील लहान मुलांना कविता कांबळे या इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या माध्यमाने प्रशिक्षण देत आहेत. याचबरोबर वसाहतीत जलतरण, नृत्य आदींसह विविध उपक्रमाचे प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न आगामी काळात केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसाहतीतील जवान श्रीकांत क्षीरसागर यांचा मुलगा सत्यम यंदा एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र ठरला आहे. त्याला एसआरपीच्या कल्याण निधीतून 1 लाख रुपयांची मदत देखील दिली असल्याचे समादेशक मंचक इप्पर यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या