भंडाऱ्यात हत्तींचा ‘फिफा फिवर’; बघ्यांच्या बाईकचा केला फुटबॉल

भंडाराच्या लाखादूर तालुक्यात दाखल झालेला हत्तींचा कळप पाहायला दुचाकीनं जाणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. हत्तींचा कळप पाहताच दुचाकी रस्त्यावर ठेवून तरुणांनी धूम ठोकली. मात्र त्याचवेळी कळपातील एका हत्तीनं दुचाकीला अक्षरश: फूटबॉलसारखे उडवून पायाखाली चिरडलं. ही घटना लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा मार्गावर बुधवारी सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.

हत्तींचा कळप लाखांदूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून दाखल झाला. या कळपातील हत्तींनी दहेगाव येथे घरांची तोडफोड केली. दरम्यान गुरुवारी सकाळी हत्ती लाखांदूर तालुक्यातील इंदोरा ते मेंढा दरम्यान असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. अनेक जण हत्ती पाहण्यासाठी या मार्गावर पोहोचले होते. सुरेश दिघोरे हेही एका सहकाऱ्यासोबत दुचाकीने हत्ती पाहण्यासाठी गेले. त्यावेळी एका व्यक्तीने सुरेशला हत्ती आल्याचे सांगितले. गोंधळलेल्या अवस्थेत सुरेशने दुचाकी रस्त्यावर उभी केली आणि धूम ठोकली.

काही वेळातच हत्तीचा कळप या मार्गावर आला. रस्त्यावर असलेली दुचाकी फूटबॉलसारखी उडविली आणि पायाखाली चिरडली. हा प्रकार दुरून सुरेश यांच्यासह अनेकजण पाहत होते. हत्तीचा कळप निघून गेल्यानंतर दुचाकीजवळ पोहोचले. तेव्हा दुचाकीचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडीओ तालुक्यात चांगलाच व्हायरल झाला आहे.

हत्ती पाहण्यासाठी या परिसरात एकच गर्दी होत असून अप्रिय घटना टाळण्यासाठी वनविभाग वारंवार सूचना देत आहेत. पोलीस विभागाने या परिसरात आता बंदोबस्त लावला असून नागरिकांना हत्तीच्या कळपापासून दूर नेले आहे.