हिंदुस्थानी फुटबॉल क्षेत्रासाठी गुड न्यूज, फिफाने एआयएफएफवरील निलंबन उठवले

आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ अर्थात फिफाने (फिफा) अखिल हिंदुस्थानी फुटबॉल महासंघावर घातलेली बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.  हिंदुस्थानी फुटबॉल महासंघात (एआयएफएफ) तिसऱया पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपाच्या मुद्दय़ावरून फिफाने ही कारवाई केली होती. मात्र हिंदुस्थानच्या सर्वोच्च न्यायालयाने हिंदुस्थानी महासंघावर नियुक्त केलेली प्रशासकीय समिती (सीओए) बरखास्त करण्याचा निर्णय घेत एआयएफएफच्या हंगामी प्रशासकीय समितीकडे कार्यभार सोपवत लवकरच महासंघाची निवडणूक घेण्याचे आदेश हिंदुस्थानी महासंघाला दिले होते. शिवाय अंडर 17 महिला फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन हिंदुस्थानातच नियोजित वेळेत व्हावे यासाठी पेंद्रीय क्रीडा मंत्रालयाला फिफाशी तत्काळ चर्चा करण्यास सांगितले होते.

  एआयएफएफवर बंदी घातल्यानंतर फिफाने आपल्या निवेदनात म्हटले होते की, तिसऱया पक्षाकडून होत असलेल्या हस्तक्षेपामुळे अखिल हिंदुस्थानी  फुटबॉल महासंघाला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंदुस्थानी फुटबॉल महासंघावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर हिंदुस्थानी  फुटबॉल क्लब्सना परदेशातील स्पर्धांत खेळणे अवघड झाले होते. पण आता हिंदुस्थानी क्लब्सचा  आशियाई स्पर्धांत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय हिंदुस्थानच्या यजमानपदाखाली 11 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणाऱया अंडर 17 फिफा महिला विश्वचषकाच्या आयोजनाचा मार्गही आता सुकर झाला आहे.

फिफा आणि एएफसी महासंघाच्या निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवणार

   फिफा आणि आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) आता हिंदुस्थानी महासंघाची निवडणूक वेळेवर आणि नियमानुसार होते की नाही यावर बारकाईने लक्ष देणार आहेत. ही निवडणूक होऊन नवी कार्यकारिणी सत्तेवर येईपर्यंत फिफा एआयएफएफच्या कामकाजावर लक्ष ठेवणार आहे. फिफाने हिंदुस्थानच्या पेंद्रीय क्रीडा मंत्रालयालाही महासंघाची निवडणूक वेळेवर व्हावी म्हणून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.