आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीचे जल्लोषात स्वागत

32

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपचे पडघम जोरात वाजू लागले असून ऑक्टोबर महिन्यात खेळल्या जाणाऱ्या या वर्ल्डकपची ट्रॉफी आज नवी मुंबईत डेरेदाखल झाली. येथील डॉ. डी.वाय. पाटील स्टेडीअमवर आणण्यात आलेल्या या ट्रॉफीचे जल्लोषात स्वागत झाले. या स्वागत सोहळ्यात आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फुटबॉलपटूंमध्ये झालेला प्रदर्शनीय सामना नवी मुंबईकरांसाठी एक पर्वणीच ठरला. युवा सेनाप्रमुख आणि मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीने स्टेडियममधील तरुणाईचा उत्साह शिगेला पोहचला.

fifa-2

फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे आज सकाळी ११च्या सुमारास नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर आदित्य ठाकरे, क्रीडामंत्री विनोद तावडे, डी. वाय. पाटील स्पोर्ट्स ऍकॅडमीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी स्वागत केले. या ट्रॉफीच्या स्वागतासाठी स्टेडियममध्ये कार्लोस ब्लाल्डरामा, इमॅन्युएल अनुनिके, फर्नांडो मॉरिएन्टेस, हार्टे कॅम्पोस, मार्सेल डिझेलली, बालादेवी, बेन बेन देवी या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या फुटबालपटूंबरोबर केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो हेही मैदानात उतरले. त्यामुळे सुमारे अर्धा तास खेळला गेलेला सामना नवी मुंबईकरांसाठी अविस्मरणीय ठरला. डी. वाय. पाटील विद्या संकुलातील विद्यार्थ्यांनी स्टेडियममध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून या ट्रॉफीचे आगळेवेगळे स्वागत केले.

fifa-1

आदित्य ठाकरे यांनी दिल्या शुभेच्छा

फिफा वर्ल्ड कप ट्रॉफीच्या स्वागतासाठी खेळल्या गेलेल्या प्रदर्शनीय सामन्यात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्टेडियममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली आणि थरारक खेळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. आदित्य ठाकरे स्टेडियममध्ये उतरले तेव्हा उपस्थित तरुणांनी एकच जल्लोष केला. सामना संपल्यानंतर सर्व फुटबॉलपटूंनी युवा सेनाप्रमुखांसह मैदानात फेरफटका मारून फुटबॉल रसिकांचा उत्साह वाढविला.

fifa

उपांत्यफेरीस ८ सामने नवी मुंबईत खेळले जाणार

फिफा वर्ल्ड कपचे ८ सामने नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. येत्या ६ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड आणि तुर्की, पॅराग्वे आणि न्यूझीलंड, १२ ऑक्टोबर रोजी टर्की आणि पॅराग्वे, अमेरिका आणि कोलंबिया यांच्या दरम्यान सामने खेळले जाणार आहेत. १८ ऑक्टोबर रोजी १६ व्या फेरीचा तर २५ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीचा सामना खेळला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या