‘रोनाल्डो’साठी स्पेनचं चक्रव्यूह, आजच्या सामन्याकडे साऱ्या जगाचं लक्ष

सामना ऑनलाईन । सोची

२१व्या विश्वचषक स्पर्धेचे बिगूल वाजले असून काल यजमान रशिया आणि सौदी अरेबिया यांच्यात झालेल्या लढतीने या महारणसंग्रामाची सुरुवात झाली. रशियाने सौदी अरेबियाला धुळ चाखत ५ – ० च्या फरकाने विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवला. परंतु, या स्पर्धेतील खरा थरार अनुभवायला मिळणार आहे तो म्हणजे आज रंगणाऱ्या स्पेन आणि पोर्तुगाल यांसारख्या बलाढ्य संघांच्या लढतीतून. विजेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन कट्टर दावेदारांच्या सलामीची लढत म्हणजे फुटबॉल प्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.

जर्सी नंबर १० आणि तिचा इतिहास…

कोणत्याही क्षणी आपल्या दमदार खेळीने सामन्याला कलाटणी देणाची क्षमता असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोवर पोर्तुगालची मदार असली तरीही समोर असलेल्या प्रतिस्पर्धी स्पेनकडे अनेक मात्तबर खेळाडूंची फौज आहे. त्यामुळे पाहताक्षणी स्पेन पोर्तुगालला धूळ चारून स्पर्धेतील पहिला विजय आपल्या पारड्यात पाडून घेईल असे चित्र दिसत आहे. पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोसह स्पेनमधील बहुतेक खेळाडूंच्या कारकीर्दीतील यंदाचा विश्वचषक शेवटचा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या शेवटच्या स्पर्धेत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी कंबर कसली आहे. महत्वाची बाब म्हणजे रोनाल्डोचा खेळ बघण्यासाठी जगभरातील क्रीडा रसिक या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत.

फिफा : उरूग्वे विरूद्ध इजिप्त; सलाहच्या परफॉर्मन्सकडे चाहत्यांचे लक्ष

विश्वचषकाचा रणसंग्राम सुरू होण्यास काही तास शिल्लक असतानाच स्पेनला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले होते. स्पेनच्या संघ व्यवस्थापनाने प्रशिक्षक ज्युलेन लोपेतेगुई यांची हकालपट्टी केल्यामुळे एकच खळबळ उडाली असून त्यांच्या जागी फर्नाडो हिएरो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघ व्यवस्थापनाने तडकाफडकी घेतलेला हा निर्णय संघातील खेळाडूंना भोवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा फायदा पोर्तुगालला नक्कीच होऊ शकतो. परंतु पोर्तुगालकडे रोनाल्डोव्यतिरिक्त दमदार खेळी करणाऱ्या खेळाडूंची यादी फार कमी आहे. या दोन बलाढ्य संघाच्या या रोमांचक लढतीत कोणत्या संघाची वर्णी लागणार आहे, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज रंगणारे सामने –

जून १५, २०१८ – शुक्रवार

इजिप्त विरूद्ध उरुग्वे – सायंकाळी ५.३० (हिंदुस्थानी वेळेनुसार)

मोरक्को विरूद्ध इराण – रात्री ८.३० (हिंदुस्थानी वेळेनुसार)

पोर्तुगल विरूद्ध स्पेन – रात्री ११.३० (हिंदुस्थानी वेळेनुसार)

आपली प्रतिक्रिया द्या