सर्बियाला अतिआक्रमकपणा भोवला; स्वित्झर्लंडची २-१ ने मात

9


सामना ऑनलाईन । कॅलिनइग्रा

रशियात सुरू असलेल्या फिफा विश्वचषकाच्या साखळी सामन्यांतील लढतीमध्ये स्वित्झर्लंडने सर्बियावर २-१ ने मात केली. पहिल्या सत्रामध्ये ०-१ ने आघाडीवर असलेल्या सर्बियाला दुसऱ्या सत्रात मागे टाकत स्वित्झर्लंडने सामन्यात पुनरागमन केले. स्वित्झर्लंडचे स्टार खेळाडू ग्रेनिट जाका आणि शकीरी यांच्यामुळे स्वित्झर्लंडला विजय मिळवणे शक्य झाले.

शुक्रवारी रात्री मॉस्कोतील कॅलिनइग्रा या स्टेडिअममध्ये स्वित्झर्लंड आणि सर्बिया यांच्यात चुरशीची लढत पहायला मिळाली. या दोन्ही संघांमध्ये फारसे चांगले खेळाडू नसले तरिदेखील दोन्ही देशांच्या मागील वाटचालीकडे वळून पाहिले तर या सामन्यामध्ये सर्बिया बाजी मारेल असे चित्र दिसत होते. मात्र, दुसऱ्या सत्रात बाजी पलटवत स्वित्झर्लंडने आगेकूच केली. स्वित्झर्लंडचा ग्रेनिट जाकाने ५२ व्या मिनिटाला गोल मारुन संघाला १- १ अशी बरोबरी मिळवून दिली. सामना संपण्यासाठी काही मिनिटांचा अवधी असताना दोन्ही संघ १- १ असे बरोबरीत होते. मात्र सामन्याच्या निर्णायक क्षणी शकीरीने ९० व्या मिनिटाला अप्रतिम गोल मारला. या गोलमुळे स्वित्झर्लंडला २- १ अशी विजयी आघाडी मिळाली.

इंज्युरी टाईममध्ये सर्बियाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला, पण स्वित्झर्लंडच्या बचावपटूंनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. मैदानावरील अतिआक्रमकपणा आणि मोक्याच्या क्षणी केलेल्या काही चुकांमुळे सर्बियाला पराभवाचा सामना करावा लागला. स्वित्झर्लंड ‘ग्रुप ई’मध्ये चार गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर याच ग्रुपमध्ये चार गुणांसह ब्राझील पहिल्या स्थानावर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या