FIFA world cup 2022 इंग्लंडवर राज्य करण्यासाठी फ्रान्स सज्ज

जगज्जेता आणि संभाव्य दावेदार म्हणून सर्वात वरच्या स्थानी असलेल्या फ्रान्सचा बलाढय़ संघ इंग्लंडवर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये फ्रान्स सुपर फॉर्मात वाटत असला तरी इंग्लंडचा संघ अभेद्य आणि अपराजित आहे. तो स्पर्धेत सलग पाचव्या सामन्यात पराभवापासून दूर राहण्याचे प्रयत्न करील. पण फ्रान्सची ताकद किलीयन एम्बाप्पे आणि ऑलिव्हिएर जिरू यांच्या जबरदस्त प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या दुप्पट नक्कीच आहे. फक्त इंग्लंडला अपराजित ठेवणाऱ्या बुकायो साका आणि मार्पस रॅशफर्डच्या पदलालित्याची किमया अल बायत स्टेडियमवर दिसायला हवी. ती दिसली तर दोन जगज्जेत्यांमध्ये अनोखा संघर्ष पाहायला मिळेल.

सध्या वर्ल्डकपमध्ये वारे फ्रान्सच्या दिशेने वाहात आहे. फ्रान्सला अखेरच्या साखळी सामन्यात टय़ुनिशियाकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला असला तरी तेव्हा ते आपल्या अर्ध्या ताकदीवरच खेळले होते. पण पोलंडविरूद्ध फ्रान्सचा खेळ सुसाट होता. किलीयन एम्बाप्पेने ठोकलेले दोन गोल आणि जिरूची त्याला लाभलेली साथ याला तोडच नव्हती. या लढतीत पोलंड हतबल होता. त्यामुळे पोलंडनंतर इंग्लंडवरही आपलेच राज्य राहावे म्हणून फ्रान्स पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. अंताईन ग्रिझमन आणि उस्मान डेम्बेले हीसुद्धा फ्रान्सची ताकद आहे आणि त्याच्याच अचूक पासवर फ्रान्स सहज सामने जिंकत आहेत. उद्याही सुरात असलेल्या फ्रान्सच्या मध्यरक्षक आणि आक्रमकांचा सूर जुळला तर इंग्लंडची काही खैर नसेल.

इंग्लंडसाठीही स्पर्धेत सर्व जोरदार आहे. विशेष म्हणजे, अद्याप ते एकाही सामन्यात हरलेले नाहीत. कर्णधार हॅरी केनने केवळ एकच गोल केला असला तरी त्यांचे स्टार खेळाडू साका, मार्पस रॅशफर्ड, जॉर्डन हेंडरसन आणि फिल पह्डन गोल ठोकण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना केवळ फ्रान्सलाच हरवायचे नाही, तर 56 वर्षांपूर्वी मिळालेल्या यशाची चव पुन्हा चाखायची आहे. हे सारं वाटतं तेवढं सोप्पं नसलं तरी इतिहास रचायला एक गोल पुरेसा असतो. इतिहास कुणाच्या बाजूने का असेना, इतिहास रचायला एक गोल पुरेसा असतो.

पोर्तुगाल की मोरोक्को?

उपउपांत्यपूर्व लढतीत पोर्तुगालने स्वित्झर्लंडविरुद्ध मिळविलेला 6-1 असा भव्य विजय आणि मोरोक्कोने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनचा 3-0 ने केलेला पराभव उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्याचा थरार वाढवणारा आहे. कारण हे दोन्ही संघ आजवर उपांत्य फेरीच्या पुढे पोहचू शकलेले नाहीत. जो जिंकेल, तो इतिहास रचेल. पण मोरोक्को जिंकली तर आफ्रिका खंडात विजयाचा जल्लोष होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. वर्ल्डकपमध्ये मोरोक्को अजूनही अपराजित आहेत. पोर्तुगालविरुद्धही त्यांनी आपला हाच करिश्मा कायम राखायचा आहे. त्यांचे नूसैर माझगावी, अचरफ हकीमी, अब्दलहमीद साबिरी, युसूफ अन नेसिरी यांचेही तेच प्रयत्न आहेत.

आजच्या उपांत्यपूर्व लढती

पोर्तुगालमोरोक्को             रात्री 8ः30 वा.

फ्रान्सइंग्लंड          मध्यरात्री 12ः30 वा.