
ब्रुनो फर्नांडिसच्या दोन खणखणीत गोलांच्या जोरावर पोर्तुगालने उरुग्वेचा 2-0 असा पराभव करीत 2006 सालानंतर प्रथमच साखळीत सलग दोन विजयांसह फिफा वर्ल्ड कपच्या बाद फेरीत धडक मारली. 2006 चा अपवाद वगळता एकाही स्पर्धेत पोतुर्गाल साखळीतच नव्हे तर स्पर्धेत केवळ एक विजय मिळवू शकला होता. त्यामुळे सलग दोन विजयांची नोंद करणारा पोर्तुगाल आपल्या फिफा वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत धडक मारण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावेल.
गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत उरूग्वेने पोर्तुगालचा 2-1 ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आज पोर्तुगालने त्या पराभवाची परतफेड करीत बाद फेरीत स्थान मिळवले. आता एच गटातून एकटा पोर्तुगाल पुढच्या फेरीत पोहोचला असून घाना, उरुग्वे आणि दक्षिण कोरिया यांच्यातील जो संघ विजयी ठरेल त्यापैकी एकाच संघासाठी बाद फेरीचे द्वार उघडले जाणार आहे.
रोनाल्डोचा बॉलला स्पर्शच झाला नाही…
पोर्तुगालने उरुग्वेविरुद्ध केलेला पहिला गोल रोनाल्डोने हेडरद्वारे केल्याचे दिसत होते. गोल होताच रोनाल्डोने आपणच गोल केल्याचा जल्लोषही केला, पण तो गोल ब्रुनो फर्नांडिसनेच केला आहे. रोनाल्डोचा बॉलला स्पर्शच झाला नसल्याचे खुद्द फिफा आणि आदिदासने स्पष्ट केल्यामुळे रोनाल्डोच्या गोलचा वाद संपला आहे. 32 व्या मिनिटाला ब्रुनो फर्नांडिसने मारलेला शॉट रोनाल्डोने हेडरद्वारे गोलपोस्टमध्ये धाडल्याचे दिसत होते. पण तो फटका रोनाल्डोच्या डोक्याला स्पर्श न होताच गोलजाळय़ात गेला होता.