पंचांच्या चीटिंगमुळे हिंदुस्थानचे स्वप्न भंगले! कतारचा हिंदुस्थानवर वादग्रस्त विजय, एएफएफआयने केली चौकशीची मागणी

कतारच्या वादग्रस्त गोलबद्दल आम्ही सामना आयुक्तांकडे तक्रार केली आहे, अशी माहिती एएफएफआयच्या अधिकाऱयांनी दिली. यामुळे आता या संपूर्ण घटनेची चौकशी होणार आहे. इराणचे हामेद मोमेनी हे हिंदुस्थानकतार सामन्यासाठी आयुक्त होते. सामन्यावर लक्ष्य ठेवणे लढतीदरम्यान फिफाच्या नियमाचे पालन होते की नाही हे तपासण्याचे काम सामना आयुक्तांचे असते. रडीच्या डावाने पराभूत झाल्यामुळे हिंदुस्थानी संघ वर्ल्ड कप पात्रता  स्पर्धेच्या दुसऱया फेरीत गटातून तिसऱया स्थानी राहिला. त्यामुळे वर्ल्ड कपच्या तिसऱया फेरीत धडक देत इतिहास घडविण्याचे हिंदुस्थाने स्वप्न अधुरेच राहिले.

पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे हिंदुस्थानचे फिफा वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेची तिसरी फेरी गाठून इतिहास रचण्याचे स्वप्न भंगले. कतारने एका वादग्रस्त गोलच्या जोरावर हिंदुस्थानचा 2-1 गोलफरकाने पराभव केला. मात्र लढतीत वादग्रस्त गोलची चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एएफएफआय) सामना आयुक्तांकडे केली आहे.

हिंदुस्थानचा आघाडीचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीच्या निवृत्तीनंतर पाच दिवसांनी हिंदुस्थानने वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेतील दुसऱया फेरीतील अखेरचा सामना बलाढय़ कतारविरुद्ध खेळला. या लढतीत लालियानजुआला चांगटेने 37 व्या मिनिटाला गोल करून हिंदुस्थानचे खाते उघडले होते. 72 व्या मिनिटांपर्यंत हिंदुस्थानी फुटबॉलपटू लयीत होते, मात्र 73 व्या मिनिटाला कतारच्या फ्री किकवर हिंदुस्थानचा गोलरक्षक आणि कर्णधार गुरप्रीत संधू यांनी उत्कृष्ट बचाव केला, मात्र चेंडू गोलपोस्टच्या बाहेर जाऊन डेड झाला होता. मात्र कतारच्या अल हसनने तो डेड झालेला चेंडू आतमध्ये ओढून घेतला, तर युसूफ येमेनने रडीचा डाव खेळत आपल्या संघासाठी बरोबरीचा गोल केला. मैदानी पंच किम वू सुंगने त्या गोलला योग्य ठरविले. सामन्यात व्हिडीओ असिस्टेंट रेफरी (व्हीएआर) हे तंत्रज्ञान नसल्याचा फटका हिंदुस्थानला बसला. या रडीच्या गोलमुळे हिंदुस्थानी गोलरक्षक व खेळाडूंनी पंचांकडे दाद मागण्याची विनंती केली, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर हिंदुस्थानी खेळाडूंनी सामन्यातील लयही गमावली. याचा फायदा घेत यजमान कतारने 85 व्या मिनिटाला गोल करीत आपल्या संघाला 2-1 असे आघाडीवर नेले. अहमद अल राजी याने हा गोल केला. ही आघाडी टिकवित कतारने विजय मिळवित फुटबॉल वर्ल्ड कपच्या तिसऱया पात्रता फेरीत धडक दिली, मात्र, पंचांनी ढापलेल्या या विजयामुळे हिंदुस्थानच्या इतिहास घडविण्याच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला.