कोरोना लढय़ात जगाला पाचवी लस मिळाली, ‘मॉडर्ना’ला डब्ल्यूएचओची आपत्कालीन मंजुरी

कोरोनाविरोधात लढण्यासाठी जगाला पाचवी लस मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आता अमेरिकन कंपनी ‘मॉडर्ना’च्या कोविड लसीला आपत्कालीन मंजुरी दिली आहे. तसेच येत्या काही दिवसांत चीनच्या सिनोफार्मा आणि सिनोवाक या लसींनाही तातडीची मंजुरी मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील वैश्विक लढय़ाला मोठे बळ मिळणार आहे.

डब्ल्यूएचओचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टिफेन बानसेल यांनी ही माहिती दिली. अमेरिकन बायोटेक कंपनी ‘मॉडर्ना’ने आपल्या कोरोना प्रतिबंधक लसीसंबंधित आकडेवारी सादर करण्यास उशीर केला. त्यामुळे कंपनीला आपत्कालीन मंजुरीसाठी काही महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली. ‘मॉडर्ना’कडून आवश्यक ती आकडेवारी प्राप्त झाल्यानंतर अखेर शुक्रवारी सायंकाळी मॉडर्ना लसीच्या आपत्कालीन वापरासाठी हिरवा झेंडा दाखवला, असे बानसेल यांनी स्पष्ट केले. मॉडर्ना लस डब्ल्यूएचओची मंजुरी मिळवणारी पाचवी लस आहे.

याआधी फायजर-बायोएनटेकची एमआरएनए लस, दोन वेगवेगळ्या पुरवठादारांकडून एस्ट्राजेनेका-ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस (यात सिरम इन्स्टिटय़ूटचा समावेश) तसेच जॉन्सन ऍण्ड जॉन्सनच्या लसीला मंजुरी मिळाली आहे. डब्ल्यूएचओने शुक्रवारी आपत्कालीन वापरासाठी आधुनिक कोविड लसींची यादी बनवली. त्यात मॉडर्ना लसीचा समावेश आहे.

अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मॉडर्ना लसीसाठी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एक आपत्कालीन वापर प्राधिकरण स्थापन केले. मॉडर्ना लसीचा इमर्जन्सी यूज लिस्टिंगमध्ये समावेश होण्यापूर्वी रणनिती सल्लागार गटाने जानेवारीत लसीचा आढावा घेतला होता. त्यात लसीचा नागरिकांसाठी वापर करण्याबाबत शिफारस केली होती.

मॉडर्नाची कोविड लस एक एमएनआरए आधारित लस आहे. ही लस कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी 94.1 टक्के प्रभावी आहे. तसेच 18 वर्षांपुढील सर्वांसाठी फायदेशीर आहे, असा निष्कर्ष एसएजीईने काढला आहे. ही लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचाही प्रतिकार करेल, असा दावा मॉडर्ना कंपनीने केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या