देशातील ‘फटिगां’ विरुद्ध लढाई!

95

उत्तर प्रदेशात काय होणार? मुंबईत काय निकाल लागणार? या प्रश्नांनी आज सगळ्यांनाच ग्रासले आहे. लोकशाहीतील निवडणुकांचे युद्ध हे हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धापेक्षाही भयंकर आहे. दिल्लीश्वरांना या दोन्ही ठिकाणी त्यांचे वर्चस्व हवे असते, पण गेल्या 30 वर्षांत ते शक्य झाले नाही. आताही होणार नाही. गोव्यातील निवडणुकांत ‘फटिंग’ हा शब्द सध्या लोकप्रिय झाला आहे. देशातील फटिंगांनी लोकशाही व स्वातंत्र्याचा खून केला आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तानचे युद्ध मागे पडेल असे युद्ध आपल्या राजकारणात सुरू असते. पाच राज्यांच्या निवडणुका हे युद्धाचे मैदानच बनले आहे. पुन्हा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हे आणखी एक मोठे युद्ध. साऱ्या देशाचे आता दोनच निकालांकडे लक्ष आहे. पहिले म्हणजे उत्तर प्रदेशात काय होणार? मुंबईचा निकाल कसा लागणार हे दुसरे. उत्तर प्रदेशातील कौटुंबिक यादवीने पुन्हा मोगल कुळातील घाणेरड्या राजकारणाची आठवण करून दिली तरीही येथे आज तरी अखिलेश यादव यांचेच पारडे विजयाकडे झुकलेले दिसते. श्री. अखिलेश यादव यांनी आपल्या वडिलांनाच राजकीय डावपेचाने मारले. या यादवीचा फायदा भाजपलाच होईल असे सुरुवातीस वाटले होते. ते चित्र आता साफ बदलले आहे. अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष व काँग्रेस यांची युती चांगल्या स्थितीत आहे. मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने आधी बिहारसारखे मोठे राज्य गमावले.

प. बंगाल व तामीळनाडूत त्यांची डाळ शिजली नाही. केरळात ते आपटले. आता उत्तर प्रदेशही त्यांना मिळणार नाही. पंजाबात निकालाआधीच पराभव झाला व गोव्यासारख्या लहान राज्यात त्यांना संघर्ष करावा लागत आहे. हे सर्व राजकीय चित्र पाहिले की, भारतीय जनता पक्ष देशपातळीवर नेमका कुठे आहे ते सहज समजते.

मोदी चुकले!

श्री. नरेंद्र मोदी हे प्रचारासाठी गोव्यात आले तेव्हा मी तिथेच होतो. शेवटी देशाचे पंतप्रधान म्हणूनच ते भाजपच्या प्रचारास तिथे आले होते व ‘भाजपास गोव्यात पूर्ण बहुमत द्या’ असे त्यांनी सांगितले. ‘बहुमत द्या, विकास करतो’ असे ते म्हणाले. हे सर्वस्वी चुकीचे आहे. देशाच्या पंतप्रधानांना आपल्याच राज्याविषयी चुकीची माहिती दिली जाते व पंतप्रधान त्यावर विसंबून भाषण करतात हे त्या दिवशी पुन्हा गोव्यात दिसले. गोव्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार पूर्ण बहुमताचेच होते. ४० आमदारांच्या विधानसभेत भाजपचे २१ आमदार निवडून आले व म. गो. पक्षाचे तीन आमदार शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहिले. किमान २५ आमदारांचे पाठबळ असताना कोणते बहुमत त्यांना हवे आहे हे भाजपने त्यांना सांगायला हवे. लोकसभेत त्यांना २८० खासदारांचे स्वत:चे बहुमत आहे. तरीही राममंदिर उभारणीसाठी त्यांना आणखी बहुमत हवे असे सांगणे हा बहुमताचा अपमान आहे. गोव्यात व दिल्लीत असा अपमान झाला आहे.

हितकारक काय?

उत्तर प्रदेशातील निवडणुकांचे निकाल काय लागतात याकडे खरे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला तर तो मोदी आणि शहा यांचा विजय असेल व पराभव झालाच तर तो भारतीय जनता पक्षाचा असेल. उत्तर प्रदेश जिंकले तर मोदी यांच्यासाठी राष्ट्रपतीपदाची निवडणूक सोपी ठरेल व मोदी यांना हवी असलेली व्यक्तीच ते राष्ट्रपतीपदावर बसवतील. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपतीपद मिळेल ही आशा आता मावळली आहे. उत्तर प्रदेशचे ४२० आमदार या निवडणुकीचे भविष्य ठरवतील व देशाच्या घटनात्मक प्रमुख पदाच्या निवडणुकीसाठीचा सर्वात मोठा घोडेबाजार त्यावेळी सुरू होईल आणि स्वत:चा माणूस निवडून यायला हवा. यासाठी त्या घोडेबाजाराकडे आपले पंतप्रधान कानाडोळा करतील. राजकारणात चारित्र्य व व्यवहारात साधनशूचिता पाळण्याची जबाबदारी इतरांची. राज्यकर्ता म्हणून सत्ता टिकविण्यासाठी आपण कोणताही मार्ग स्वीकारायला मोकळे. यावर टीका करणाऱ्यांना देशद्रोही ठरवून बदनाम करण्याचे काम सध्या चालले आहे. राजकारणात गोडबोले वाढले आहेत. नेहमीच गोड बोलणारे लोक पुष्कळ आढळतात, परंतु अप्रिय असले तरी हितकारक आहे तेच बोलणारा वक्ता आणि श्रोता हे दोघेही आता दुर्मिळ झाले आहेत.

गोव्याचे संरक्षणमंत्री

श्री. मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री आहेत, पण त्यांचा एक पाय गोव्यात असतो. त्यांचे मन गोव्यात फिरत असते व गोव्याचा कारभार ते देशाच्या संरक्षण मंत्रालयातून रिमोट कंट्रोलने पाहतात, असा प्रचार काल संपलेल्या निवडणुकीत झाला. पणजीतील गोवा सुरक्षा मंचच्या प्रचारसभेत मी होतो. व्यासपीठावरील एकाने सांगितले, ”पणजीचे पर्रीकर यांचे प्रचंड टेरर आहे.” पर्रीकरांचा ‘टेरर’ हा गोव्यात सर्वत्र चर्चेचा विषय आहे. संरक्षणमंत्र्यांची दहशत पाकिस्तानसारख्या शत्रूला असायला हवी. अतिरेक्यांना त्यांची भीती वाटायला हवी. त्याऐवजी आपल्याच राज्यातील गरीब व कायदा पाळणाऱया लोकांना ते भीती दाखवीत आहेत. सत्तेचा वापर करून लोकांच्या जुन्या फायली उघडायच्या, पोलिसांचा वापर करायचा व लोकांच्या पोटापाण्यावर मारायचे. गोव्यातील स्वत:चे राजकीय स्थान टिकवून ठेवण्यासाठी हे प्रताप सुरू आहेत. श्री. पर्रीकर यांना हे शोभत नाही. इंदिरा गांधींचीही एकाधिकारशाही देशातील लोकांनी चालवून घेतली नाही व त्यांचा पराभव केला.

सत्तेचा गैरवापर

निवडणुका म्हणजे युद्ध बनले आहे हे खरे. याचा अर्थ सत्तेचा वापर करून विरोधक व सत्य बोलणाऱ्यांना खतम करायचे असा होत नाही. पर्रीकर यांनी गोव्यात भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घातले व त्याच भ्रष्ट मंत्र्यांचा प्रचार करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोव्यात फिरत होते. स्वच्छ कारभार व पारदर्शक व्यवहाराचा हा बुरखाच त्यामुळे फाटला. भारतीय जनता पक्षाचे खरे रूप काय हे समजून घ्यायचे असेल तर गोव्यात येऊन श्री. सुभाष वेलिंगकर यांना एकदा भेटायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ऋषी भाजपसाठी रोज शापवाणीच उच्चारत होता व त्याचा परिणाम गोव्यात होईल. वेलिंगकर यांनी मनोहर पर्रीकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा उल्लेख ‘फटिंग’ असा केला. या कोकणी शब्दाचा अर्थ ‘खोटारडा’ किंवा ‘लफंगा’ इतक्यावरच ते थांबत नाहीत. हे सर्व लोक प्रोफेशनल फटिंग आहेत व त्यांनी लोकांना फसवून खिसे भरण्याचे लायसन मिळवले आहे असे ते संतापून सांगतात. श्री. अण्णा हजारे हे सध्या लुप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील राजकारण्यांवर ते व्यक्तिगत द्वेषातून आरोप करीत असतात. दिल्ली व गोव्यातील ‘फटिंग’विरोधातही त्यांनी आता उतरायला हवे!

 

आपली प्रतिक्रिया द्या