पिंपरीत बिलाच्या वादातून तरुणाचे अपहरण करून खून

94
murder-knife

सामना प्रतिनिधी । पिंपरी

कासारवाडी येथील शितल हॉटेल मध्ये सुरू असलेल्या बिलाच्या वादावरून भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाचे अपहरण करून, डोक्यात कोयत्याने वार करून तसेच गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना सोमवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास घडली.

पिंपरी महानगरपालिका इमारतीच्या मागील बाजूला वरदहस्त सोसायटी समोरील रस्त्यावर हितेश मूलचंदानी (वय23, पिंपरी) याचा खून करण्यात आला आहे. या प्रकरणी चौघांवर संशय आहे.

पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश हा पिंपरी परिसरात मित्रांसोबत बसला होता. दरम्यान, त्याच्या मित्राची कासारवाडी येथील शितल हॉटेलमध्ये बिल देण्यावरून वादावादी झाल्याचा त्याला फोन आला. त्यामुळे तो त्याच्या इतर मित्रांसोबत शितल हॉटेल येथे गेला. याठिकाणी हॉटेल मालकांनी एकाला पकडून ठेवले. त्यावेळी बिल न देणाऱ्यांनी त्यांच्या इतर साथीदाराना बोलवले.

यातील चौघांनी हितेशला जबरदस्तीने गाडीत बसवले. पिंपरी महानगरपालिका इमरतीच्या मागील बाजूला वरदहस्त सोसायटी समोरील रस्त्यावर आणले. तेथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले आणि गळा कापला. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्याचा मृत्यू झाला. खून करणारे सराइत गुन्हेगार असून पोलीस त्यांच्या शोध घेत आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या