लढाऊ ‘तेजस’ची भरारी

228

या वर्षी प्रथमच गणतंत्र दिवसाच्या कवायतीत तेजस या संपूर्ण हिंदुस्थानी बनावटीच्या हलक्या लढाऊ विमानाचे संचलन झाले आणि सर्वच हिंदुस्थानींचा ऊर अभिमानाने भरून आला. यावर  ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी टाकलेला प्रकाश…

तेजस एकआसनी, एका इंजिनवर चालणारे अति हलके आणि बहुउपयोगी लढाऊ विमान आहे. हिंदुस्थानी संरक्षण दलात उत्तम दर्जाच्या, पण स्वस्त लढाऊ विमानांची गरज अनेक वर्षांपासून जाणवली आहे. गेल्या काही वर्षांत हवाई दलातील मिग विमानांचे अपघात लक्षात घेता हे महत्त्वाचे आहे.

जनसामान्यांसमोर तेजस प्रथमच आले असले तरी गेल्या जूनपर्यंत तेजसने ३००० हून अधिक चाचणी उड्डाणे केली आहेत आणि सर्व चाचण्यात तेजस यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही. लढाऊ विमानांचा वेग जास्त असणे महत्त्वाचे असते आणि तेजसने आपल्या चाचणीत १.४ मॅक, म्हणजेच आवाजाच्या १.४पट वेग गाठला. अशा प्रकारच्या विमानांची गरज लक्षात घेऊन केंद्र सरकारने १९९९ साली एक आसनी आणि दोन आसनी लढाऊ तेजस विमानाच्या निर्मितीसाठी मंजुरी दिली. तेजसमध्ये चाकांची रचना मजबूत असावी आणि जमिनीवर उतरल्यावर वेग कमी होण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गतिरोधक लावण्याचे ठरविले.

तेजसच्या निर्मितीत अनेक सरकारी, सार्वजनिक आणि खाजगी संस्थांचा सहभाग आहे. त्यात प्रमुख संस्था म्हणजे संरक्षण विभागाची एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए), हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड (एचएएल), डिफेन्स रिसर्च अॅंण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ), कॉउन्सिल फॉर सायंटिफिक अॅंण्ड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल), डिरेक्टोरेट जनरल ऑफ एरोनॉटिकल क्वॉलिटी अश्योरन्स (डीजीएक्यूए), भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना, तसेच अनेक शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे.

एडीएची स्थापना १९८४ साली झाली. आपल्या संशोधनासाठी या संस्थेला १९८६ साली ५७५ कोटी रु. देण्यात आले. ४ जानेवारी,  २००१ साली हिंदुस्थानने आपल्याच देशात निर्माण केलेल्या पहिल्या लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टची चाचणी करण्यात आली. या विमानाला डेमोन्स्ट्रेटर वन असे नाव देण्यात आले. जून 2002 साली डेमोन्स्ट्रेटर टूची चाचणी झाली. प्रत्येक चाचणीनंतर विमानात नवनवीन बदल मांडण्यात आले आणि विमानाचा विकास आराखडा २००२ साली बनविला, जो सरकारने मंजूर केला.

नमुना म्हणून नवीन बनावटीचे विमान सेकंड प्रोटोटाईप व्हेईकल पीव्ही घ्घ् चे पहिले उड्डाण डिसेंबर २००५ साली, तर दुसरे उड्डाण डिसेंबर २००६ साली झाले. झालेल्या संशोधनाचा आढावा घेऊन आणि चाचणीचे परिणाम पाहून केंद्र सरकारने दुसऱया चाचणीच्या आधीच, म्हणजे एप्रिल २००६ मध्ये २० तेजस विमानाच्या निर्मितीसाठी परवानगी दिली. ही सर्व विमाने भारतीय वायुसेनेसाठी होती. निर्मितीचे आदेश आल्यापासून एक वर्षात ते तयार झाले आणि एप्रिल २००७ साली तेजसचे पहिले उड्डाण यशस्वीपणे पार पडले. दुसरीकडे दोन आसनी तेजस शिकाऊ विमानाच्या निर्मितीचे काम चालू होते, मात्र त्याचे चाचणी उड्डाण नोव्हेंबर २००९ साली झाले. मागणी कमी असल्यामुळे अशा विमानाचे उत्पादन कमी असते म्हणून त्याला लिटेड सिरिझ प्रोडक्शन (एलएसपी)असे नाव देण्यात आले. एलएसपी ४ आणि एलएसपी ५ची चाचणी जून आणि नोव्हेंबर २०१० मध्ये करण्यात आली.

तेजसच्या निर्मितीसाठी काम करणारे अभियंता जरी चाचणी उड्डाणाचे परिणाम पाहून खूश असले तरी ही विमाने हवाई दलाकडे सुपूर्द करण्याआधी ते विमान हवाई दलात उड्डाण करण्यासाठी योग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते आणि या प्रमाणपत्राला इनिशल ऑपरेशनल क्लिअरन्स (आयओसी) असे म्हणतात. या आयओसीसाठी चाचणी डिसेंबर २०१० मध्ये झाली आणि जानेवारी २०११ मध्ये ते प्रमाणपत्र देण्यात आले. हे प्रमाणपत्र जरी जानेवारी २०११ मध्ये आले असले, तरी हवाई दलाला तेजसच्या कार्यक्षमतेबद्दल खात्री असावी. कारण नोव्हेंबर २००८ मध्येच हवाई दलाने आपल्याला सात तुकड्यांसाठी ४० तेजस विमानांची मागणी केली होती, मात्र ही सर्व विमाने आयओसीसहित असावी अशी अट होती. एलएसपी ७ ची चाचणी मार्च २०१२ तर एलएसपी ८ ची चाचणी मार्च २०१३ मध्ये पूर्ण झाली. डिसेंबर २०१३ मध्ये तेजसने हवेतून मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी केली आणि त्यात हवे असलेले परिणाम दिसून आले आणि त्याच महिन्यात आयओसी प्राप्त झाले. ही कामगिरी चालू असताना डीआरडीओने आत्याधुनिक युद्धसंचाची निर्मिती केली आणि ही यंत्रणा तेजसमध्ये बसविण्यात आली.

वायूदलात सामील होण्यासाठी योग्य होण्याकरिता तेजसची चाचणी ऑक्टोबर २०१४ मध्ये झाली आणि जानेवारी २०१५मध्ये संपूर्णपणे भारतीय बनावटीचे अत्याधुनिक लढाऊ विमान तेजस, भारतीय वायूसेनेत दाखल झाले. दुसरीकडे तेजस अधिक उपयोगी बनविण्यासाठी प्रयत्न चालूच आहेत. त्याच दिशेने निर्माण केलेले सेकंड सिरीज प्रोडक्शन (एसपी २)चे चाचणी उड्डाण मार्च २०१६ मध्ये करण्यात आले. हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडने २०१६ मध्ये सहा तेजस विमानांचे उत्पादन केले आणि दर वर्षी १६ विमाने बनविण्याचा संकल्प हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेडचा आहे.

नौदलात लागणाऱ्या विमानांची गरज वेगळी आहे म्हणून नौदलासाठी वेगळी विमाने बनविण्याचे काम चालूच आहे. नौदलासाठी उपयुक्त अशा विमानाचे पहिले उड्डाण एप्रिल २०१२ मध्ये करण्यात आले.

वायूसेनेला २० तेजस एमके १आणि २० एमके २ अशी ४० तेजस विमाने पुरविण्यात येणार आहेत. पहिली २० विमाने आयओसी प्रमाणित असतील, तर उर्वरित २० विमाने फुल ऑपरेशनल क्लिअरन्स (आयओसी) असतील.

उत्तम मारा करण्यासाठी विमानाचा वेग महत्त्वाचा असतो आणि वेग वाढविण्यासाठी विमानाचे वजन कमी असणे गरजेचे असते. तेजस हलक्या धातूचा वापर करून बनविण्यात आले आहे. यात ४२ टक्के कार्बन फायबर आहे आणि ४३ टक्के अॅॅल्युमिनियम अॅलोयचा समावेश आहे. तसेच टायटॅनियम आणि लिथियमचाही वापर करण्यात आला आहे. विमानाचे पंख कार्बन आणि अॅल्युमिनियमपासून बनविण्यात आले आहे. बंगळुरूच्या नॅशनल ऐरोस्पेस लॅबोरेटरीज (एनएएल)ने विमानाचा मुख्य भाग बनविला आहे. तेजसचे कॉकपिट रात्रीदेखील स्पष्ट दिसेल अशा काचेपासून बनविले आहे, ज्यात इंग्लंडच्या मार्टिन बेकरने बनविलेली इजेक्ट सीट आहे, ज्यामुळे संकटप्रसंगी वैमानिक क्षणात विमानातून बाहेर फेकला जाऊ शकतो.

कॉकपिटमध्ये ७६ मिमीचे लिक्विड क्रिस्टल डीसप्ले लिक्विड(एलसीडी)चे दोन स्क्रीन आहेत, ज्याची निर्मिती केंद्र सरकारच्या सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंटलने केली आहे. या विमानात उड्डाणासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे, तसेच उत्तम ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) आहे, त्यामुळे शत्रूच्या भूमीत योग्य ठिकाणी मारा करणे सोपे जाते. तेजसचे इंजिन जनरल इलेक्ट्रिकचे आहे.

या विमानात भारतीय बनावटीचे इंजिन वापरण्याचा उद्देश होता, मात्र गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने तयार करायला घेतले. कावेरी इंजिन योग्य वेळेत तयार झाले नाही म्हणून जीईचे इंजिन वापरण्यात आले आहे. तेजस ताशी २,२०५ किमी जाऊ शकते आणि १५,२०० मीटर्सची उंची गाठू शकते. हे विमान ३००० किमीपर्यंत जाऊ शकते. विमानाचे वजन ५,४५० किलो आहे आणि ते एकदंर १३,५०० किलो वजन (स्वत:चे धरून) घेऊन उडू शकते. भारतीय वायुसेनेकडे असलेल्या रशियन मिग १६ विमानांचे वारंवार होणारे अपघात लक्षात घेता तेजसचे महत्त्व आणि गरज वाढली आहे.

तेजस एका इंजिनवर चालणारे लढाऊ विमान असल्याने दोन इंजिनची विमाने बनवणाऱ्या कंपन्या हिंदुस्थानात आपले विमान विकू शकणार नाहीत, यात बोइंगचे एफ/ए १८ आणि डसौल्टची राफेल विमाने असतील, तर लॉकहीडचे एफ १६ आणि साबचे ग्रीपेन ही एका इंजिनवर चालणारी विमाने तेजसशी स्पर्धा करतील अशी अपेक्षा आहे.

 

 

 

 

आपली प्रतिक्रिया द्या