‘विदर्भसिंह’ जांबुवंतराव धोटे यांचे निधन

21

सामना ऑनलाईन,नागपूर

‘विदर्भसिंह’ अशी ख्याती असलेले विदर्भातील लढाऊ नेते, माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे आज पहाटे साडेतीन वाजता हृदयविकाराच्या तीक्र झटक्याने निधन झाले. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. धोटे हे 83 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवारी यवतमाळ जिल्हय़ातील त्यांच्या लासली-पिपरा या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धोटे यांच्या निधनाने एक ‘संघर्षनायक’ हरपल्याची भावना विदर्भात व्यक्त होत आहे.

धोटे हे पाच वेळा महाराष्ट्र विधानसभेत आणि दोन वेळा लोकसभेत निवडून गेले होते. स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी दीर्घकाळ लढा देतानाच त्यांनी विदर्भातील ज्वलंत प्रश्नांवर सतत आवाज उठवला. त्यांनी इंग्रजी भाषेच्या विरोधात केलेले आंदोलन आणि विणकरांसाठी दिलेला लढा गाजला होता. धोटे यांनी अकोला येथे कृषी विद्यापीठ व्हावे या मागणीसाठी 1968 सालात प्रखर आंदोलन केले होते. त्यात पाचजण शहीद झाले होते.

1959 सालात धोटे यांनी जवाहरलाल दर्डा यांना पराभूत करून ‘नगरसेवक’ बनून संसदीय राजकारणात पदार्पण केले होते, तर 1962 सालात ते ‘फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षातर्फे यवतमाळ मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले होते. 1971 सालात इंदिरालाटतेही त्यांनी ‘फॉरवर्ड ब्लॉक’तर्फेच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 1980 मध्ये धोटे हे नागपूर येथून काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत गेले होते. 2002 सालात त्यांनी ‘विदर्भ जनता काँग्रेस’ स्थापन केली होती.

जाबुवंतराव धोटे यांच्या पश्चात पत्नी विजया आणि क्रांती व ज्वाला या दोन कन्या असा परिवार आहे. धोटे हे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांचे जावई होत.

विधानसभा अध्यक्षांवर भिरकावला होतापेपरवेट

महाराष्ट्र विधानसभेत आमदार असताना जांबुवंतराव धोटे यांनी 1964 साली तत्कालीन विधानसभा अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्यावर ‘पेपरवेट’ भिरकावला होता. त्यावरून धोटे यांची आमदारकी रद्द झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या