भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत राडा : राज्य सहकारी संघ निवडणूक

33
fight
file photo

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्य सहकारी संघाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांच्या निवडणुकीत बहुमत आपल्याकडेच असल्याच्या वादातून भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राडा केला. संघाच्या कार्यालयातील टेबल-खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली, तर निवडणूक प्रक्रियेदरम्यान एका कार्यकर्त्याने रिव्हॉल्व्हर रोखल्याने निकडणुकीस गालबोट लागले आहे. निवडणूक प्रक्रियेतील गोंधळामुळे सहकार विभागाने पदाधिकाऱ्यांची ही निवडणूक प्रक्रिया स्थगित केली आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राज्य सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सोमवारी सकाळी ११ वाजता सहकारी संघाच्याच कार्यालयात विजयी २१ उमेदवारांमधून संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. त्या ठिकाणी टेबल-खुर्च्या तोडण्यात आल्या. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार पॅनल’ आणि काँग्रेसप्रणित संजीव कुसाळकर यांचे ‘परिवर्तन पॅनल’ यांच्यात निवडणूक झाली होती. त्यात कुसाळकर यांच्या परिवर्तन पॅनलला यश मिळाले होते. निवडणूक अर्ज माघारीवेळी एकच अर्ज आल्याने सात संचालक बिनविरोध निवडून आलेले आहेत. आमदार दरेकर हे या संस्थेच्या मावळत्या कार्यकारिणीचे संचालक आहेत. दोन्ही पॅनलनी आपल्याकडेच बहुमत असल्याचा दावा केल्यावरून हा प्रकार घडला.

दरम्यान, संघाच्या कार्यालयात सोमवारी विजयी उमेदवारांमधून संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मानद सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होती. प्रक्रियेदरम्यान दोन्ही गटांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे पत्र सहकार विभागाचे उपनिबंधक आणि निवडणूक निर्णय अधिकारी आनंद कटके यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे पाठविले आहे. प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर पुढील तारीख निश्चित होण्याची अपेक्षा आहे.

मुंबई सहकारी बँकेचे विद्यमान संचालक नितीन बनकर यांच्यावर अमोल घुले यांनी रिव्हॉल्व्हर रोखल्याचा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना केला, तर आमदार दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निवडणूक प्रक्रियेच्या ठिकाणी येऊन गोंधळ घातल्याचा प्रत्यारोप महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा आणि या संस्थेच्या विद्यमान संचालिका विद्या पाटील, सुनीता माळी यांनी पत्रकारांशी बोलताना केला. संघाच्या नूतन पदाधिकारी निवडीसाठी बोलाविण्यात आलेल्या सभेत अल्पमतात असल्याने व पराभूत होणार याची माहिती असल्यामुळेच भाजप आमदार प्रवीण दरेकर व प्रसाद लाड यांनी संचालकांना शिवीगाळ, धक्काबुक्की करीत गोंधळ घातला. पोलिसांसमोर हा प्रकार सुरू असताना सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे पोलिसांनी दरेकर व लाड यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोप संघाचे संचालक मुकुंदराव पवार यांनी केला आहे. दरेकर व लाड यांनी सरकारमधील मंत्र्यांकडून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव आणत सभा तहकूब केली. संघाच्या निवडणुकीत राजकारण घुसविण्याचे काम भाजप आमदारांनी केले असून, ही घटना लोकशाही प्रक्रियेला काळिमा फासणारी आहे. त्यामुळे आमदार दरेकर व लाड यांना तत्काळ अटक करावी, तसेच संचालकांना पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणीही पवार यांनी केली.

आपली प्रतिक्रिया द्या