मुख्यमंत्री, आयुक्तांच्या नावे परवाना देणाऱ्यांवर एफआयआर दाखल करणार

सामना ऑनलाईन । मुंबई

पालिकेकडून ऑनलाइन परवाना देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे ‘लेडीज बार ऍण्ड रेस्टॉरंट’ आणि आयुक्त अजोय मेहता यांच्या नावे ‘हुक्का पार्लर’चा परवाना देणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करणार असल्याचे प्रशासनाने विधी समितीच्या बैठकीत सांगितले. यापुढे असे प्रकार घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल असे आश्वासनही प्रशासनाने दिले.

‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत पालिका प्रशासनाने परवान्यांची ऑनलाइन सेवा उपलब्ध करून दिली आहे, मात्र यामधील त्रुटींमुळे मुख्यमंत्री आणि आयुक्तांच्या नावे दुकाने व आस्थापना विभागाच्या वतीने बार, हुक्का पार्लरचा परवाना वितरित करण्यात आला. यामुळे पालिकेच्या ऑनलाइन सेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या विधी समितीच्या बैठकीत ऍड. सुहास वाडकर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करून संबंधित प्रकाराचे प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली.  यावेळी प्रशासनाने संबंधित प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आश्वासन दिल्याचे विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे यांनी सांगितले. या प्रकाराची चौकशी त्रिसदस्यीय समितीच्या माध्यमातून करावी आणि सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करावा, असे निर्देशही म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.