पॉर्न फिल्म्स प्रकरण, क्रिकेट बेटिंग कंपनीच्या बँक खात्यातून राज कुंद्राच्या बँक खात्यात आली रोकड

पॉर्न फिल्म्सचा उद्योग करणाऱ्या राज कुंद्रा याच्या खासगी बॅंकेच्या खात्यात क्रिकेट बेटिंग करणाऱ्या मर्क्युरी इंटरनॅशनल या कंपनीच्या बॅंक ऑफ आफ्रिका या बॅंक खात्यातून रोकड आल्याचे तपासात समोर आले आहे. नेमकी किती रक्कम कुंद्राच्या खात्यात आली हे अद्याप स्पष्ट झाले नसून बेटिंगचा पैसा कुंद्राने पॉर्न फिल्म्सच्या उद्योगासाठी लावला होता का याचा पोलीस आता शोध घेत आहेत.

राज कुंद्रा याने केलेल्या पॉर्न फिल्म्सच्या उद्योगाबाबत तपास करत असलेल्या पोलिसांना काही महत्त्वाच्या बाबी हाती लागल्या आहेत. पॉर्न फिल्म्सच्या उद्योगातून कुंद्राने रग्गड पैसा कमावला. त्याचे फॉरेन्सिक ऑडिट पोलीस करीत आहेत. तपासादरम्यान कुंद्रा याच्या बॅंक खात्यात क्रिकेट बेटिंगचा धंदा करणाऱ्या मर्क्युरी इंटरनॅशनल कंपनीच्या बॅंक ऑफ आफ्रिका या बॅंकेच्या खात्यातून रोकड जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पॉर्न फिल्म्स प्रकरणात बेटिंगचा पैसा लागला होता का? क्रिकेट बेटिंगमध्येही राज कुंद्राचा संबंध आहे का? या दिशेने आता तपास करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. राज कुंद्राच्या कार्यालयातून तसेच रायन थॉर्प याच्या घरातून लॅपटॉप ताब्यात घेण्यात आले असून सायबर तज्ञांकडून त्याचा तपास करण्यात येत आहे. दोघांच्या लॅपटॉपमधून बऱयाच बाबी समोर येतील असेही पोलीस सूत्रांकडून सांगण्यात येते.

शिल्पा शेट्टीचा जबाब नोंदवला

राज कुंद्राची पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हीदेखील विआन कंपनीची संचालिका होती. त्यामुळे विआन कंपनीच्या माध्यामातून राज कुंद्राने जो पॉर्न फिल्म्सचा उद्योग केला, त्याची तिला माहिती होती का? लंडनस्थित केनरिन कंपनी, हॉटशॉट अॅप याबाबत तिला काही माहिती होती का? कंपनीच्या बॅंक खात्यात जमा होणाऱ्या रकमेबाबत ती अवगत होती का? हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी शिल्पा शेट्टी हिचा जबाब नोंदवून घेतला. तिने जबाबात काय सांगितले त्याचा तपशील रात्री उशिरापर्यंत समजू शकला नव्हता.

दोघांच्या कोठडीत वाढ

राज कुंद्रा आणि त्याच्या कंपनीत आयटी प्रमुख म्हणून काम करणाऱ्या रायन थॉर्प यांच्या पोलीस कोठडीची मुदत शुक्रवारी संपल्याने त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. तेव्हा पॉर्न फिल्म्सचा उद्योग करणाऱ्या राज कुंद्रा याच्याकडे पैशांचा व्यवहार, सहआरोपींची माहिती आदींबाबत चौकशी करणे आवश्यक असल्याने त्याच्या कोठडीची मागणी करण्यात आली. त्यानुसार कोर्टाने राज कुंद्रा आणि रायन थॉर्प यांच्या पोलीस कोठडीत 27 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली.

जुहू येथील घराची झाडाझडती

राज कुंद्रा याच्या कार्यालयाची झडती घेतल्यानंतर पोलीस पथकाने शुक्रवारी कुंद्रा याच्या जुहू येथील घरावर धडक दिली. दुपारी दोनच्या सुमारास पोहोचलेल्या पोलिसांनी कुंद्राच्या घराची झडती घेतली. यावेळी एक लॅपटॉप पोलिसांनी ताब्यात घेतला. त्या लॅपटॉपमधून पॉर्न फिल्म्स उद्योगाबाबत काही माहिती मिळते का याचा पोलीस सायबर तज्ञांच्या मदतीने शोध घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या