आर्मी पेपर लीक प्रकरणातले खरे सूत्रधार तातडीने शोधा – शिवसेना

48

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

लष्कर भरती प्रकरणातील पेपरफुटीचे प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री असलेल्या मनोहर पर्रीकरांच्या गोव्यातच आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गाव असलेल्या नागपुरातच ही पेपरफुटी होत असेल तर त्यापेक्षा दुर्दैव ते काय, असा खडा सवाल विचारत या पेपर लीक प्रकरणातील खरे सूत्रधार आणि त्यामागचा मेंदू शोधून काढा, अशा शब्दांत शिवसेनेने राज्यसभेत सरकारला ठणकावले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पेपरफुटीप्रकरणी बोटचेपी भूमिका घेणाऱया सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

पेपरफुटीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. सरकारने नेहमीप्रमाणे कारवाईचे आश्वासन दिले असले तरी त्यातून ठोस असे हाती लागलेले नाही. राज्यसभेत याच मुद्यावर संजय राऊत यांनी सरकारला घेरले. देशाच्या संरक्षणाची ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांच्याकडे पेपरही सुरक्षित राहिले नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या गावात पेपरला पाय फुटले, हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. याप्रकरणी लष्कराची गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोपही खासदार राऊत यांनी केला. राऊत यांच्या हल्ल्यामुळे संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे चांगलेच गांगरले. या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करू वगैरे शब्दांत त्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यामुळे राज्यसभेतील सदस्यांचे समाधान झाले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या