अंधेरीतील गोखले पुलाच्या गर्डरचे काम करण्यास विलंब केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने कंत्राटदाराला तीन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. 15 जुलैपर्यंत गर्डर आणून तो बसवण्याचे काम सुरू करायचे होते. मात्र, निश्चित केलेल्या तारखेपर्यंत गर्डर न आल्यामुळे महापालिकेने पंत्राटदाराला दणका देत तीन कोटींचा दंड ठोठावला. त्याचबरोबर गर्डरच्या कामात देखरेख करण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल पालिका अभियंत्याचाही कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
अंधेरीतील 2018 साली गोखले पुलाचा काही भाग कोसळून झालेल्या अपघातानंतर 7 नोव्हेंबर 2022 पासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या कामांत तांत्रिक अडचणी आल्याने गोखले पूल आणि बर्फीवाला पूल दोघांत 2.8 मीटरचे अंतर वाढले. त्यामुळे दोन पूल जोडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. त्यासाठीही पंत्राटदाराला मे 2024 मध्ये तीन कोटींचा दंड करण्यात आला होता. या कामाच्या असफल प्रयत्नामुळे दुसरा गर्डर बसवण्याच्या कामाची मुदत सहा महिन्यांनी वाढली होती. शेवटी एका गर्डरचे काम पूर्ण झाल्यामुळे जुलै 2024 साली जूहू ते अंधेरी अशी एक मार्गिका सुरू करण्यात आल्याने अंधेरी, सांताक्रुझमधील प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे तर दुसरा गर्डर बसवण्याचे काम आजपासून सुरू झाले असून त्यासाठी आठवडा लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पुढील काम करण्यासाठी रेल्वेकडून ब्लॉक मिळण्याची मागणी पालिका करणार आहे. त्यानंतर पुढील कामे होणार आहेत.
पूल सुरू होण्यास मे 2025 उजाडणार
गोखले पूल 2022 साली वाहतुकीसाठी बंद करून पूल उभारण्याचे काम सुरू झाले. दुसरा गर्डर बसवण्याचे काम सुरू करण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागला आहे. मात्र, सध्या पुलावरचा दुसरा गर्डर बसवण्याचे काम झाल्यानंतरही तेथील पोहोच रस्त्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यासाठी मे 2025 साल उजाडणार आहे, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली.