ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीबद्दल रामदेव बाबांच्या पतंजलीला ११ लाखाचा दंड

127

सामना ऑनलाईन । हरिद्वार

लाईक कराट्विट करा

प्रख्यात योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व प्रचाराबद्दल पाच प्रकरणात पतंजली कंपनीच्या पाच उत्पादक युनिटला हरिद्वारच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी ११ लाख रुपये दंड ठोठावला आहे. सद्या पंतजली आयुर्वेद कंपनीची वार्षिक उलाढाल ५००० कोटी रुपयांची असून पुढील वर्षापर्यत ती १०,००० कोटी रुपये करण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे.

दुसऱ्या कारखान्यात तयार केलेले उत्पादन आपल्या कारखान्याचे असल्याचे सांगून त्यावर आपले पतंजलीचे लेबल लावून विकले जात असल्याचे स्पष्ट होत आहे, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. यामुळे अन्न सुरक्षा मानक अधिनियम २००६ च्या कलम ५२ व ५२ आणि फूड सेफ्टी अँड स्टँण्डर्ड (पॅकेजिंग अँड लेबलिंग रेग्युलेशन -२०११) च्या कलम २३.१ (५) चे उल्लंघन झाले आहे.

या प्रकरणाशी संबंधीत खाद्याचे नमुने १६ ऑगस्ट २०१२ मध्ये घेतले होते. जिल्हा अन्न सुरक्षा विभागाचे हरिद्वार येथील प्रभारी अधिकारी योगेंद्र पांडेय यांनी कनखल येथील दिव्य योग मंदिरातून पतंजली कडून उत्पादित केलेले डाळीचे पीठ, मध, मोहरीचे कच्चे तेल, जॅम, मीठ यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी रुद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.

प्रयोगशाळेच्या अहवालानुसार पतंजलीची ही उत्पादने निकष चाचणीत यशस्वी झाली नाहीत. त्यामुळे जिल्हा खाद्य सुरक्षा विभागाने एडीएम न्यायालयात २०१२ मध्ये खटला दाखल केला होता. गेली चार वर्षे याची सुनावणी सुरु होती. सुनावणी दरम्यान पतंजली कंपीनीने मांडलेली भूमिका न्यायालयाने अमान्य करीत आपला निर्णय जाहिर केला.

पतंजली कंपनीला ११ लाख रुपये दंडाची रक्कम महिनाभरात न्यायालयाच भरावयाची आहे. याशिवाय भविष्यात कंपनीच्या कामकाजावर नजर ठेवण्याचे आदेश न्यायालयाने अन्न सुरक्षा विभागाला दिले आहेत. एमडीएम न्यायालयाने ही निर्णय १ डिसेंबर रोजी दिला होता. तो आता प्रसिद्ध झाला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या