कॉमेडी कलाकार कपिल शर्माविरोधात एफआयआर दाखल

23

सामना ऑनलाईन । मुंबई

कॉमेडी कलाकार कपिल शर्माचा पाय आणखी खोलात गेला आहे. कपिलने प्रसारमाध्यमं आणि प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित करत आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून अश्लिल शिवीगाळ केल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यापाठोपाठ कपिल विरोधात इंग्रजी न्यूज पोर्टल स्पॉटबॉयचा एडिटर विक्की लालवानी यांनी एफआयआर दाखल केली आहे. कपिलवर फोनवरून शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. पवई पोलीस स्थानकामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्यादी विक्की लालवानी आणि कपिल शर्माची चौकशी करण्यात येईल.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ व्हायरल झाला होता. या ऑडिओमध्ये कपिल शर्मा पत्रकार विक्की लालवानी यांना अश्लिल शिवीगाळ करताना ऐकू येत होते. स्पॉटबॉय या पोर्टलवर खासगी गोष्टी लिहिल्याबद्दल कपिल शर्मा याने लालवानी यांना शिवीगाळ केली आहे.

कपिल शर्माचा हा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यासोबत काम करणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे आणि कृष्णा अभिषेकने त्याचे समर्थन केले होते. परंतु अभिनेत्री उपासना सिंहने यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. कपिल शर्मा असे काही करू शकेल यावर आपला विश्वासच बसत असल्याचे तिने म्हटले होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आल्याने आधीच वेगवेगळ्या प्रकरणात अडकलेल्या कपिल शर्माच्या अडचणी वाढल्या आहेत. सहकलाकार सुनिल ग्रोवरसोबत वाद झाल्यापासून कपिलच्या मागे शुक्लकाष्ट लागले आहे.

शो बंद होणार?
मोठ्या पडद्यावर कपिलचा फिरंगी हा चित्रपट जोरदार आपटल्यानंतर कपिलला तगडा झटका बसू शकतो. कपिलचा नुकताच सुरू झालेल्या नवा कोरा ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ हा शो बंद होणार अशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत या शो चे ३ एपिसोड प्रदर्शित झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या