‘डीएसके’विरोधात मुंबईत गुन्हा

15

सामना ऑनलाईन । मुंबई

पुणे तसेच कोल्हापूरमधील शेकडो गुंतवणूकदारांना फसवणाऱ्या बिल्डर दीपक सखाराम कुलकर्णी म्हणजेच डीएसकेने मुंबइतही अनेकांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील सुमारे १४४ जणांनी डीएसकेविरोधात तक्रार दाखल केली असून कोट्यावधींचा गंडा घातल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील दादर परिसरात डीएसकेचे कार्यालय आहे. डीएसकेने गुंतवणुकीच्या नावाखाली फसवल्याच्या एकपाठोपाठ एक तक्रारी येत होत्या. त्यानुसार याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुह्याची व्याप्ती आणि फसवणुकीची रक्कम सुमारे सात कोटींहून अधिक असल्याने हा गुन्हा तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. आतापर्यंत १४४ गुंतवणूकदारांनी तक्रार केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले. धन धना धन, कायम ठेव अशा वेगवेगळ्या स्कीमच्या नावाखाली १२ ते १४.४ टक्के परतावा देण्याचे आमिष डीएसकेकडून दाखविण्यात आले. इतकेच नाही तर पाचपेक्षा अधिक वर्षे गुंतवणूक केल्यास दुप्पट रक्कम देण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. सुरुवातीला काहींना परतावा मिळाला; पण जानेवारी-फेब्रुवारीत पैसे मिळायचे बंद झाल्याचे गुंतवणूकदारांनी तक्रारीत म्हटले आहे.

– आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास
पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने डीएसकेविरोधात ३०० गुंतवणूकदारांना फसविल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कोल्हापूर जिह्यातही सुमारे ६००च्या वर गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि माजी सैनिकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या